
नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्हा परिषदेच्या (Nagpur Z P) पंचायत विभागाकडे उमरेड आणि रामटेक तालुक्यातील गावांसाठी अल्पसंख्याक विभागाने सुमारे एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ही कामे आपल्याला मिळावी यासाठी ठेकेदार उत्सूक असले तरी कुठल्या गावांमध्ये रक्कम खर्च करायची हेच ठरत नसल्याने सहा महिन्यांपासून निधी सुमारे पडून आहे.
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडील दलित वस्ती विकास निधीच्या धर्तीवरच अल्पसंख्याक विभागाकडून ग्रामीण भागातील अल्पसंख्याक प्रवर्गातील नागरिकांच्या गावे, वाड्या वस्तींमध्ये मुलभूत सुविधा; जसे दर्गा, कब्रस्थान, रस्ते, इदगाह आदी विकास कामांसाठी निधी देण्यात येत असतो. त्यानुसार अल्पसंख्याक विभागाकडून नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि रामटेक या दोन तालुक्यांसाठी प्रत्येकी ५० लाख याप्रमाणे एक कोटीचा निधी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु या निधीतून सदरची कामे कुठल्या गावात करायची याची माहिती अल्पसंख्याक विभागाकडून जि.प.ला उपलब्ध झाली नाही. त्यामुळे जि.प. प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
यासंदर्भात मागील काही दिवसांपूर्वी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात पत्र व्यवहार केल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु त्यानंतरही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. एकंदरीत शासनाचे अल्पसंख्याकांच्या विकासाकडे दुर्लक्षच झाल्याचे यावरून दिसून येत आहे. हा निधी नेमका कोणत्या गावात खर्च करायचा यासंदर्भात कुठल्याही सूचना नसल्याने पंचायत विभागापुढे हा निधी खर्च करायचा कुठे असा पेच निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हा निधी आला होता. मात्र आता राज्यात सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे गावांची प्रायोरिटी बदलणार आहे. रामटेक तालुक्यात शिवसेनेचे बंडखोर आशिष जयस्वाल आमदार आहेत. उमरेड तालुक्यात काँग्रेसचे राजू पारवे आमदार आहेत. जयस्वाल शिंदे गटात सहभागी झाले असल्याने या निधीवर त्यांचेच वर्चस्व राहणार आहे.