
नाशिक (Nashik) : रेल्वे मंत्रालयाने 2019-20 या अर्थसंकल्पात मंजुरी दिलेल्या जळगाव जिल्ह्यातील मध्य रेल्वेवरील पाचोरा - जामनेर - बोदवड या 83.90 किमी लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 955 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे 100 वर्षांपासूनच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे लवकरच ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर होणार आहे. या रेल्वे मार्गावर 9 रेल्वे स्थानकांची उभारणी व तितकेच प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत.
पाचोरा - जामनेर हा नॅरोगेज रेल्वे मार्ग शंभर वर्षे जुना आहे. या रेल्वे मार्गाचे रुपांतर ब्रॉडगेज रेल्वे मार्गात झाल्यास मुंबईला जाण्यासाठी कमी वेळ लागेल म्हणून प्रवाशांकडून येथे ब्रॉडगेज मार्गाची मागणी सातत्याने होत होती. यामुळे 2014 मध्ये खासदार झालेल्या रक्षा खडसे यांनी 2015 मध्ये या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रुपांतर करण्याच्या शक्यतेची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने 2019-20च्या अर्थसंकल्पात पाचोरा-जामनेर-बोदवड या या रेल्वे मार्गास मंजुरी दिली होती. आता रेल्वे मंत्रालयाने या 83.90 किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 955 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रेल्वे मार्गावर पाचोरा, वरखेडी, पिंपळगाव, शेंदूरणी, पहुर, भागदरा, जामनेर, वाकी, बोदवड ही नऊ स्थानके उभारली जाणार आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर 24 कोच क्षमतेचे प्लॅटफॉर्म, अप व डाऊन मार्गावर स्थानक इमारत व 300 मीटर लांबीची तिसरी रेल्वे लाईन उभारली जाणार आहे. यासाठी 955 कोटी रुपये निधी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे.
अजंठा लेणीची मागणी अमान्य
पाचोरा - जामनेर या रेल्वे मार्गावरील शेंदूरणी रेल्वे स्थानक येथून संभाजी नगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जवळ आहेत. पर्यटकांना अजिंठा येथे जाणे अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी या रेल्वे मार्गात अजिंठा पर्यंत रेल्वेचाही समावेश करावा अशी जुनी मागणी आहे. मात्र रेल्वेने ही मागणी अमान्य केल्याचे दिसत आहे.