

नाशिक (Nashik): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महिन्यात घेतलेल्या आढाव्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये अडथळा आणणाऱ्याना थेट तुरुंगात टाकले जाईल, असा सज्जड दम दिला होता. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नव्हते, तर परत हे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सोडा हे घेऊन माझ्याकडे यायचे नाही, असा इशाराही त्यांनी आमदारांना दिला होता. त्यानंतरही नाशिकमधील पंचवटी विभागात काही नगरसेवक त्यांच्या माणसांकडून सिंहस्थ कुंभमेळा कामात अडथळा आणून काम बंद पाडण्याची धमकी ठेकेदारांना दिली जात आहे.
ठेकेदाराकडून आर्थिक देवाणघेवाणीची भाषा करणे व ती पूर्ण न झाल्यास काम बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार थेट महापालिका आयुक्तांकडे काही ठेकेदारांनी केल्या आहेत. एवढेच नाही तर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनाही याबाबत पत्र देऊन पोलिस बंदोबस्त पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे कामात अडथळा आणणाऱ्या या नगरसेवकांविरोधात मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरात जवळपास १३०० कोटींची २८ रस्त्यांची, सांडपाणी व्यवस्थापन, एसटीपी, रामकाल पथ आदी पायाभूत विकासाची कामे सुरू आहेत. प्रशासकीय कारकिर्दीत ही कामे करीत असलेल्या ठेकेदारांना लोकप्रतिनिधींचा फारसा त्रास नव्हता.
महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर विकासकामे, टेंडर प्रक्रिया तसेच कामासंदर्भात नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठेकेदारांना थेट विचारणा केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेदेखील तक्रारी पोचल्या आहेत. यामुळे मागील महिन्यात मुंबई येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर बैठकीचा समारोप करताना खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सिंहस्थ कुंभमेळा कामात निर्माण केल्या जात असलेल्या अडथळ्यांचा विषय काढला.
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामांमध्चे कोणी अडथळे आणल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याचवेळी त्यांनी एकदा गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी कोणीही आमदाराने आपल्याकडे यायचे नाही, असाही इशारा दिला होता. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला न जुमानता काम सुरू असलेल्या प्रकल्पावर जाऊन कंत्राटदारांना धमकाविण्याचे प्रकार होत आहेत.
मे. ए. के. शिवहरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्यातर्फे प्रकल्प व्यवस्थापक सचिन मोरे यांनी महापालिका आयुक्त मनिषा खत्री व पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना पत्र देवून बंदोबस्ताची मागणी केली आहे. या पत्रानुसार आरटीओ कार्यालय (पेठ रोड) ते राज स्वीट चौक (दिंडोरी रोड) ते रासबिहारी शाळा ते निलगिरीबाग बाग ते टाकळी एसटीपी या दरम्यान आठ किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे.
या आठ किलोमीटर परिघातील काही नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रकल्पस्थळी जाऊन कामांबाबत विचारणे करणे, कामात अडथळा निर्माण करण्यासह कामगारांना शिवीगाळ व धमकी देऊन बेकायदेशीर आर्थिक मागण्यांसाठी दबाव टाकला जात असल्याचे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे.
या प्रकारांमुळे कामावर परिणाम होत असून, असुरक्षितता व भीतीच्या वातावरणात कर्मचारी कामे करत आहेत. परिणामी कामे विलंबाने होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार कामे घेतली आहे. परंतु चुकीच्या हस्तक्षेपामुळे कामांवर परिणाम होत असून उपाययोजना करावी, पोलीस संरक्षण द्यावे व कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.