

नाशिक (Nashik): विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार कुंभमेळा प्राधिकरणने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्राधिकरणाकडून जारी करण्यात येणाऱ्या सर्व प्रशासकीय आदेशांसाठी युनिक क्यूआर कोड आधारित डिजिटल ई-ऑथेंटिकेशन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे प्रत्येक अधिकृत आदेशाची सत्यता काही क्षणांत पडताळून पाहणे शक्य होणार आहे. यामुळे मागील काळात बनावट आदेश तयार करून फसवणूक करण्याच्या प्रकारांना आळा बसू शकणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि विकासकामे सुरू आहेत. या कामांशी संबंधित प्रशासकीय आदेश, मंजुरी, निर्देश आणि पत्रव्यवहार यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राखण्याबरोबरच बनावट आदेश, कागदपत्रांमधील फेरफार किंवा दिशाभूल करणाऱ्या दस्तऐवजांना आळा घालण्यासाठी ही अत्याधुनिक डिजिटल प्रमाणीकरण प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या प्रणालीअंतर्गत प्राधिकरणाकडून जारी होणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय आदेशावर स्वतंत्र आणि युनिक क्यूआर कोड छापण्यात येईल. नागरिक, कंत्राटदार, शासकीय अधिकारी किंवा संबंधित यंत्रणांना हा क्य़ूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करताच आदेशाची सत्यता तात्काळ पडताळून पाहता येईल. संबंधित आदेश शासनाच्या अधिकृत सार्वजनिक पोर्टलवरील मूळ दस्तऐवजाशी लिंक करण्यात येणार असल्याने आदेशाची अधिकृत आवृत्ती सहज उपलब्ध होईल आणि कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव राहणार नाही.
क्यूआर कोड आधारित ई-ऑथेंटिकेशन प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. आदेशांमध्ये फेरफार करणे, बनावट आदेश तयार करणे किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिशाभूल करण्याच्या प्रकारांना प्रभावी आळा बसेल. तसेच अधिकृत आदेशांवरील नागरिक, कंत्राटदार आणि विविध विभागांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे कुंभमेळा प्राधिकरणने म्हटले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने सर्व नागरिक, कंत्राटदार, शासकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आवाहन केले आहे की, प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशावर कार्यवाही करण्यापूर्वी त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करून आदेशाची सत्यता निश्चित करावी. यामुळे अधिकृत दस्तऐवजांची खात्री करूनच पुढील कार्यवाही करता येईल आणि प्रशासनातील पारदर्शकता अधिक प्रभावीपणे जपली जाईल.
फसवणूक टाळण्यासाठी
प्रत्येक अधिकृत आदेशावर युनिक क्यूआर कोड
एका स्कॅनमध्ये आदेशाची तत्काळ पडताळणी
शासनाच्या अधिकृत सार्वजनिक पोर्टलशी थेट लिंक
बनावट आदेश व कागदपत्रांतील फेरफारांना आळा
पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रशासकीय व्यवस्था
नागरिक, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांसाठी सुलभ डिजिटल पडताळणी