Nashik: द्वारका चौक १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला; वडाळानाका अंडरपासचे काम सिंहस्थानंतर

सारडा सर्कल-काठेगल्ली भूमिगत मार्गाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश; पुणे दिशेचा १३.५ मीटरचा सर्व्हिस रोड सिंहस्थापूर्वी, तर ३०० मीटरच्या दोन अंडरपासचे काम कुंभमेळ्यानंतर
nashik, dwarka chowk
nashik, dwarka chowkTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक शहरातील द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला वेग देण्यात आला आहे. मुंबई-धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून सारडा सर्कल ते काठेगल्ली चौक या मार्गावरील भूमिगत मार्गांचे उर्वरित काम १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करून द्वारका चौक वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला (MSIDC) दिले आहेत.

nashik, dwarka chowk
Nashik: कुंभमेळा प्राधिकरणाचाही स्वतंत्र टेंडरसेल

पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड पूर्ण १३.५ मीटर रुंदीने विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र, पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक धुळ्याकडे आणि धुळेमार्गे येणारी वाहतूक नाशिक शहरात वळवण्यासाठी वडाळानाका येथे प्रस्तावित ३०० मीटर लांबीच्या अंडरपासचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर केले जाणार असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

द्वारका चौकातील कामाला वेग

द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या कामाला यावर्षी फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. त्यानंतर द्वारका चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, मुंबई-धुळे मार्गिकेवरील वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने द्वारका परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी प्रकल्पातील महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. सारडा सर्कल ते काठेगल्लीदरम्यानचा भूमिगत मार्ग पूर्ण करून १५ ऑक्टोबरपर्यंत द्वारका जंक्शन वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. मात्र, संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबरपर्यंत वेळ लागू शकतो, अशी माहिती आहे.

nashik, dwarka chowk
टेंडर म्हणजे काय? जाणून घ्या टेंडर प्रक्रियेचा A to Z प्रवास

वडाळानाका येथे दोन अंडरपासचा प्रस्ताव

नाशिकरोडहून पंचवटीकडे जाणाऱ्या आणि धुळे मार्गाकडून नाशिक शहरात येणाऱ्या वाहनांमुळे पुन्हा वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वडाळानाका परिसरात ३०० मीटर लांबीचे दोन अंडरपास तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये नाशिकरोडकडे जाणाऱ्या भूमिगत मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूक जोडली जाणार आहे. तसेच वडाळानाका येथे आणखी एक ३०० मीटर लांबीचा अंडरपास तयार केला जाणार आहे. या कामासाठी द्वारका चौकातील सध्याचे भूमिगत मार्ग तोडावे लागणार आहेत.

ही कामे पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना दिशेनुसार अंडरपास आणि सर्व्हिस रोडचा वापर करता येणार आहे. मुंबई, धुळे आणि नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी फॅनिंग पद्धतीने सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलांचा वापर करता येईल. त्यामुळे द्वारका चौक सिग्नलमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.

nashik, dwarka chowk
१६व्या वित्त आयोगात निधीवाटपाचे निकष बदलले; उत्पन्नवाढीनुसार मिळणार अनुदान

सिंहस्थापूर्वी कोणती कामे पूर्ण होणार?

द्वारका चौकातील संपूर्ण प्रकल्पाचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी, म्हणजे जुलै २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने वाहतूक आणखी काही काळ पर्यायी मार्गाने वळवावी लागू शकते. आधीच सहा-सात महिन्यांपासून वाहतूक वळवण्यात आल्याने वाहनचालकांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी सारडा सर्कल ते काठेगल्लीदरम्यानचा भूमिगत मार्ग आणि पुणे मार्गाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. उर्वरित काम सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

nashik, dwarka chowk
Nashik: कुंभमेळा प्राधिकरणाचाही स्वतंत्र टेंडरसेल

Key Points

  • द्वारका चौकातील सारडा सर्कल ते काठेगल्लीदरम्यानचा भूमिगत मार्ग १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश,

  • पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड १३.५ मीटर रुंदीने विकसित करण्याचा निर्णय,

  • वडाळानाका येथे ३०० मीटर लांबीचे दोन अंडरपास तयार करण्याचे नियोजन,

  • वडाळानाका अंडरपाससाठी द्वारका चौकातील सध्याचे भूमिगत मार्ग तोडावे लागणार,

  • द्वारका चौक सिग्नलमुक्त करण्याचे उद्दिष्ट; मात्र संपूर्ण प्रकल्पाचे काम सिंहस्थापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता कमी,

  • सारडा सर्कल-काठेगल्ली भूमिगत मार्ग आणि सर्व्हिस रोडचे काम सिंहस्थापूर्वी, तर उर्वरित काम सिंहस्थानंतर करण्याचे नियोजन.

Tendernama
www.tendernama.com