

नाशिक (Nashik): गंगापूर धरण परिसराला पर्यटनाच्या नकाशावर अधिक व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी जलसंपदा विभागाने ९.३५ हेक्टर क्षेत्रावर रिसॉर्ट आणि जलपर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीने राबविण्यात येणारा हा प्रकल्प विकासकाला ४९ वर्षांसाठी चालविता येणार आहे.
गंगापूर धरणावर सध्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा बोट क्लब कार्यरत आहे. आता गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाकडून (GMIDC) धरण परिसरात जलपर्यटन आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स सुविधा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझरखेड, भावली आणि गंगापूर या तीन धरणांवर खासगी- सार्वजनिक भागीदारीतून जलपर्यटन सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार गंगापूर धरणातील ९.३५ हेक्टर जागेसाठी एकरकमी, परतावा न मिळणारे २२ लाख ८ हजार ९३८ रुपयांचे प्रीमियम निश्चित करण्यात आले आहे. किमान सरासरी वार्षिक भाडे १४ लाख ७३ हजार रुपये असून, त्यात दरवर्षी ५ टक्के वाढ होणार आहे.
रिसॉर्टसह जलपर्यटन सुविधांचा विकास
हा टेंडर केवळ विद्यमान जागेच्या संचालनापुरता मर्यादित नसून गंगापूर धरण पर्यटन प्रकल्पाचा विकास करण्यासाठी आहे. डिझाइन-बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) पद्धतीने खासगी भागीदाराची निवड केली जाणार आहे. संबंधित भागीदाराने स्वतःच्या गुंतवणुकीतून विकासकामे करून प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल करायची आहे.
प्रस्तावित सुविधांमध्ये रिसॉर्ट, कॉटेज, इनडोअर व आउटडोअर रेस्टॉरंट, दुकाने, बँक्वेट हॉल, इनडोअर गेम्स, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, स्विमिंग पूल, जलपर्यटन पॅव्हिलियन, पाथवे, पार्किंग, लॅंडस्केपिंग, वॉशरूम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) आणि जलशुद्धीकरण प्रकल्प (WTP) यांचा समावेश आहे.
धरणाच्या जलाशयात जलपर्यटनासाठी स्लिपवे, बोटींच्या ये-जा व उभारणीसाठी रॅम्प, मरीना, फ्लोटिंग जेट्टी, बोर्डिंग-डिबोर्डिंग प्लॅटफॉर्म आणि अन्य जलक्रीडा सुविधा उभारण्याची मुभाही देण्यात आली आहे.
पर्यटनासाठी ९.३५ हेक्टर क्षेत्र
गिरणारे येथील सर्व्हे क्रमांक ३२१ मध्ये जलसंपदा विभागाची एकूण १२.१२ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ९.३५ हेक्टर क्षेत्र पर्यटन प्रकल्पासाठी विकसित करण्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित क्षेत्रापैकी काही भाग भविष्यात मत्स्य प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
गंगापूर धरण नाशिक शहरापासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर आहे. परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने चांगली जोडणी असून, येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा बोट क्लबही कार्यरत आहे.
लक्झरी इको-रिसॉर्टपासून साहसी उपक्रमांपर्यंत
अर्नेस्ट ॲण्ड यंग या प्रकल्प सल्लागार संस्थेने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. गंगापूर धरण परिसरात लक्झरी इको-रिसॉर्ट, वॉटरफ्रंट रिक्रिएशन, इको-स्टे, निसर्गभ्रमंती, साहसी उपक्रम, पक्षीनिरीक्षण क्षेत्र, डिजिटल सुविधा आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
मात्र, जलाशयाचा प्राथमिक वापर पिण्याचे पाणी, सिंचन आणि धरण सुरक्षा यासाठीच राहणार आहे. पर्यटनाला त्यानंतरचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे जलपातळी, पाणी सोडण्याची प्रक्रिया, पूरस्थिती आणि धरण सुरक्षेच्या नियमांनुसार जलपर्यटनाच्या सुविधा नियंत्रित कराव्या लागणार आहेत.
Key Points
गंगापूर धरणातील ९.३५ हेक्टर क्षेत्रावर रिसॉर्ट आणि जलपर्यटन प्रकल्प प्रस्तावित
प्रकल्पासाठी ४९ वर्षांचा कालावधी आणि PPP पद्धतीने विकासाचे नियोजन
२२ लाख ८ हजार ९३८ रुपयांचे एकरकमी, परतावा न मिळणारे प्रीमियम
किमान सरासरी वार्षिक भाडे १४ लाख ७३ हजार रुपये; दरवर्षी ५ टक्के वाढ
रिसॉर्ट, कॉटेज, रेस्टॉरंट, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि स्विमिंग पूलसह विविध सुविधा प्रस्तावित
स्लिपवे, मरीना, फ्लोटिंग जेट्टी आणि बोर्डिंग-डिबोर्डिंग प्लॅटफॉर्मची सुविधा प्रस्तावित
लक्झरी इको-रिसॉर्ट, वॉटरफ्रंट रिक्रिएशन आणि इको-स्टेची संकल्पना
जलाशयाचा प्राथमिक वापर पिण्याचे पाणी, सिंचन आणि धरण सुरक्षेसाठीच राहणार