
पुणे (Pune) : वाहनधारकांचा ‘उच्च सुरक्षा नंबर प्लेट’साठी (एचएसआरपी-HSRP) सुरू असलेला अडचणींचा प्रवास कमी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे (आरटीओ-RTO) उपाययोजना केल्या जाणार आहेत.
शहरातील वाहनांची संख्या आणि ‘एचएसआरपी’ केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेता संबंधित कंपनीला केंद्रांची संख्या वाढवावी, या संदर्भात आरटीओने पत्र दिले आहे. मुदतीपूर्वी वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी आवश्यक तेवढी केंद्रे सुरू करावी, असे त्यात नमूद केले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
भोसले म्हणाले, ‘‘एचएसआरपी बसविणारे केंद्र बंद पडल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी निश्चित केलेल्या तारखेलाच त्यांच्या नजीकचे केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासंदर्भात त्यांना माहिती देण्यासाठी संबंधित कंपनीकडून दूरध्वनीद्वारे संपर्क केला जाईल. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘एचएसआरपी’ केंद्र बंद होऊन वाहनधारकांची गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.’’
महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे म्हणाले, ‘‘‘एचएसआरपी’बाबत वाहनधारकांना अनेक तक्रारींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असून, आर्थिक नुकसान होत आहे. अनेक वाहनचालकांचे आरटीओतील ‘वाहन’ सॉफ्टवेअरमध्ये दूरध्वनी क्रमांक अद्ययावत करण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे ही सक्ती उपयोगाची नाही. ‘एचएसआरपी’ बसविणाऱ्या कंपनीच्या पारदर्शकतेवरही शंका उपस्थित होत आहेत. आरसी बुकबाबत कंपनीविरोधात अनेक तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत. त्यामुळे कंपनीला दिलेल्या कंत्राटाबाबत पुनर्विचार व्हावा.’’
वाहनविक्रेत्यांसाठी परिपत्रक काढणार
‘‘एक एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांची विक्री करताना पुण्यातील काही विक्रेत्यांनी जुनीच नंबर प्लेट बसवून दिली. आता ते ‘एचएसआरपी’ बसवून देण्यास तयार नाहीत, अशा वाहनविक्रेत्यांना ‘एचएसआरपी’ बसवून देणे बंधनकारक आहे. या संदर्भात पुढील दोन दिवसांत परिपत्रक काढण्यात येणार आहे,’’ असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भोसले यांनी सांगितले.