Railway : बोरघाटात आता रेल्वेचा नवा प्रयोग; पुणे-मुंबई प्रवास होणार वेगवान

Railway
RailwayTendernama

पुणे (Pune) : पुणे- मुंबई दरम्यानचा रेल्वेप्रवास जलद गतीने व्हावा, याकरिता बोरघाटात समतल दोन नव्या मार्गिका सुरू करण्याचे रेल्वे बोर्डाचे नियोजन आहे. त्याकरिता गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करीत आहे. हे काम आता अंतिम टप्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत याचा अहवाल सादर केला जाणार आहे. याला मंजुरी मिळाल्यास बोरघाटात दोन अतिरिक्त मार्गिका व १० नवे बोगदे तयार केले जातील. हा मार्ग समतल असल्याने यासाठी ‘बँकर’ (इंजिन)ची गरज नाही. शिवाय पावसाळ्यात दरडी कोसळून रेल्वे वाहतूक विस्कळित होण्याचा धोकादेखील बऱ्याच अंशी कमी होईल.

Railway
Nagpur : एकीकडे वाहतूक कोंडीने वैताग अन् दुसरीकडे पूल सुरू करण्यासाठी नाही मुहूर्त

लोणावळा - कर्जत दरम्यान असणाऱ्या घाट सेक्शनमध्ये दोन नव्या मार्गिका व १० बोगदे तयार करण्यासाठी रेल्वे प्रशासन आग्रही आहे. घाटात सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेल्या मार्गिकांसारखे नवी मार्गिका नसेल. त्यामुळे मार्गावर चढ-उतार राहणार नाही. परिणामी कर्जतहुन पुण्याला येताना ‘बँकर’ लावण्याची आवश्यकता नाही. शिवाय रेल्वेची गतीदेखील कमी होणार नाही.

तर घाटात पाच मार्गिका
सध्या बोरघाटात तीन मार्गिका आहे. अप, डाऊन आणि मिडल. पावसाळ्यात दरडी कोसळल्यानंतर यातील एखाद्या तरी मार्गिकेचे नुकसान होऊन ती वाहतुकीसाठी बंद होते. याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. शिवाय सातत्याने प्रवासी रेल्वे व मालगाडी धावत असल्याने लोणावळ्याहून कर्जतकडे जाणाऱ्या मार्गिकांवर ताण येऊन रुळांची झीज मोठ्या प्रमाणात होते. यातून अपघाताचादेखील धोका असतो.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने लोणावळा-कर्जत दरम्यान दोन अतिरिक्त मार्गिका टाकण्याचा निर्णय घेतला. दोन नवीन मार्गिका व बोगदा झाल्यास रेल्वे वाहतुकीसाठी ५ मार्गिका उपलब्ध होतील. परिणामी रेल्वे वाहतूक अधिक जलद व विनाअडथळा होईल.

Railway
Mumbai : 'व्हीजेटीआय', 'आयआयटी'च्या आयडियाची कमाल; महापालिकेची तब्बल 100 कोटींची बचत

आधी ‘राईट्स’ आता कोकण रेल्वे
नवीन रेल्वेमार्ग होत असताना त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजदाद करणे व अन्य कामांसाठी रेल्वेची ‘राईट्स’ ही संस्था काम करते. हीच संस्था सुरवातीला लोणावळा-कर्जत दरम्यान चौथी व पाचवी मार्गिकेसाठी डीपीआरचे काम करीत होती. मात्र घाटातील काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने हे काम कोकण रेल्वेला दिले. कोकण रेल्वे हे काम पूर्णत्वास नेत आहे. जेथे दरडी जास्त पडतात त्याच ठिकाणी १० नवे बोगदे बांधण्यासाठी जागेची देखील निश्चिती झाली आहे. आव्हानात्मक ठिकाणी काम करण्यात कोकण रेल्वेचे प्रावीण्य आहे.

हा आहे नव्या मार्गिकांचा फायदा
- गाड्यांची संख्या वाढेल, गाड्यांचा वेग कमी करावा लागणार नाही
- कर्जत-लोणावळा दरम्यान गाड्यांना बँकर लावावे लागणार नाही
- दरडी कोसळून अथवा एखाद्या मार्गावर रेल्वे अपघात झाल्यास दुसऱ्या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू राहील
- नव्या मार्गिका समतल असल्याने रुळांचे आयुर्मान अधिक राहील
- प्रवासी सेवा बाधित होणार नाही
- पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होईल

Railway
Nashik : 25 कोटींच्या मॉडेलरोडसाठी सीबीएस ते कॅनडाकॉर्नर मार्गावर दीड वर्षे केवळ एकेरी वाहतूक

सध्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तो पूर्ण होताच रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल. रेल्वे बोर्ड प्रशासनाच्या मंजुरीनंतर याच्या कामाला सुरवात होईल.

- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com