
पुणे (Pune) : साधारण सहा महिन्यांपूर्वी महापालिका परिवहनकडून स्वारगेट ते नांदेड सिटी अशी बस सेवा सुरू झाली, मात्र सदरील बस फेरीची सुविधा तोकडी पडत असल्याचे स्थानिक नागरिकांना जाणवू लागले आहे. नांदेड सिटी या हायप्रोफाईल सोसायटी परिसरात पन्नास ते साठ हजार लोकसंख्या आहे. त्यामध्ये शालेय तसेच महाविद्यालयीन तरुण, नोकरदार महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. बसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे.
नांदेड सिटी परिसरात पीएमपी बस वगळता इतर सार्वजनिक कोणतीही वाहतुकीची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिकांना पीएमपी बस सेवेवर विसंबून राहावे लागत आहे. त्यात पीएमपी बसच्या मर्यादित सहा फेऱ्याच असल्याने स्थानिकांना दुपारच्या वेळी प्रवास करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे स्वतःचे वाहन नसल्या कारणाने त्यांना शहरात जाण्यासाठी किंवा इतरत्र प्रवास करण्यास अडचण निर्माण होते आहे.
नांदेड सिटी परिसरात पीएमपी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, यासाठी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी पीएमपीला नुकतेच निवेदन दिले आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही होऊन बसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी नांदेड सिटी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
आम्हा ज्येष्ठ नागरिकांना शहरात किंवा इतरत्र जाण्यासाठी बस उपलब्ध नसते. दुपारच्या वेळी याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. आमच्याकडे स्वतःची वाहने नाहीत. त्यामुळे आम्ही प्रवास करावा की नाही? ज्येष्ठ नागरिकांना नांदेड सिटीतून बाहेर जाण्यासाठी बससेवा फार उपयुक्त आहे, पण फेऱ्या फारच कमी आहेत. कृपया यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
- ज्ञानेश्वर सोळसकर, ज्येष्ठ नागरिक, नांदेड सिटी