PMC
PMCTendernama

Pune : 9 वर्षांपासून रखडलेल्या 'या' प्रकल्पाच्या उद्घाटनाला मुहूर्त का मिळेना?

Published on

पुणे (Pune) : कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारात बांधण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचे काम पूर्ण होऊनही उद्‍घाटनाची मात्र प्रतीक्षाच आहे. नऊ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे; मात्र अद्यापही या नाट्यगृहाच्या उद्‍घाटनाला मुहूर्त लागला नाही.

PMC
रखडलेल्या लातूर ते टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक चुरसकथा समोर, ठेकेदाराने...

या प्रकल्पाच्या कामाला २०१५ मध्येच निधी मंजूर झाला होता. मात्र, त्यानंतर प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने पुढे सरकले. यावर्षी एप्रिलमध्येच या नाट्यगृहाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाले होते. तसेच, आवारातील वाहनतळाच्या इमारतीचे कामही पूर्णत्वास आले होते. त्यानंतर काही दिवसांतच या नाट्यगृहाचे उद्‍घाटन होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने उद्‍घाटन लांबणीवर पडले. त्यानंतरदेखील चार महिन्यांच्या कालावधीत उद्‍घाटन झाले नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा उद्‍घाटन रखडले आहे.

PMC
Mumbai : स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनसबाबत आली मोठी बातमी; आता...

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या विस्तारीकरणांतर्गत या नाट्यगृहाचे काम हाती घेण्यात आले होते. कलामंदिरात सुमारे ४०० आसनक्षमतेचे बालनाट्यगृह आणि पहिल्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांची व्यंग्यचित्रे, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या चित्रफिती असे स्वरूप असलेले कायमस्वरूपी कलादालन बांधण्याचे नियोजन आहे.

याशिवाय आरक्षण कार्यालय, मेकअप रूम, रंगीत तालमीसाठी छोटेखानी सभागृह, उपाहारगृह, स्वच्छतागृह अशा सुविधाही या वास्तूमध्ये असतील. दरम्यान, या नाट्यगृहाचे काम पूर्ण झाल्यावर एकाच आवारात दोन नाट्यगृह, असा अभिनव प्रयोग प्रत्यक्षात येणार आहे.

तसेच, नाट्यगृहामुळे बालनाट्यांना फायदा होणार आहे. मात्र, अद्याप उद्‍घाटन होत नसल्याने बालनाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची प्रतीक्षा वाढत आहे.

Tendernama
www.tendernama.com