
चिखली (Chikhali) : कुदळवाडी येथील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाईला व्यावसायिक, मजुरांनी तीव्र विरोध केला. तसेच रस्ता रोको आंदोलन केल्याने महापालिकेच्या पथकाला कारवाई न करताच रिकाम्या हातांनी माघारी परतावे लागले.
कुदळवाडी येथील अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पथक नुकतेच देहू - आळंदी रस्त्यावर दाखल झाले. त्यापूर्वी महापालिकेने या परिसरातील अनधिकृत पत्राशेड, दुकाने आणि बांधकामांना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यामध्ये अनधिकृत पत्राशेड, दुकाने आणि बांधकामे काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
महापालिकेची नोटीस मिळाल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी दुकाने खाली करण्यास सुरुवात केली होती. बहुतांशी व्यावसायिकांनी जागा घेऊन व्यवसाय थाटल्याने त्यांनी महापालिकेकडेच अर्ज विनंती करून कारवाई टाळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
मात्र, कुदळवाडी परिसरात वेळोवेळी लागणाऱ्या लहान-मोठ्या आगी आणि होणारे प्रदूषण यामुळे महापालिकेने अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व जेसीपी दाखल झाले.
घोषणा देत कारवाईस विरोध
शेकडोंच्या संख्येने व्यावसायिक, कामगार आणि स्थानिक नागरिक देहू - आळंदी रस्त्यावर जमा झाले. त्यांनी हातात झेंडे घेऊन रस्ता रोको केला. तसेच घोषणा देत कारवाई करण्यास तीव्र विरोध केला. पत्राशेडमध्ये राहणारे असंख्य कामगार रस्त्यावर उतरले. त्यामुळे, परिसरात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आरक्षित रस्ते आणि जागेवरील कारवाईस आमची हरकत नाही. मात्र, पत्राशेड आणि दुकानावर कारवाई करण्यास विरोध असल्याचे व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांना सांगितले.