
पुणे (Pune) : मुंबई-बंगळूर महामार्गावरील (Mumbai - Bengaluru Highway) भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास या सेवा रस्त्याच्या कामाला सोमवारपासून (ता. २१) सुरवात झाल्याने या मार्गावरील वाहतूक हिंजवडी वाहतूक पोलिसांनी ३१ मे पर्यंत इतर रस्त्यांनी वळविली आहे.
भुजबळ चौकातील हॉटेल रानजाईसमोरील सेवा रस्त्यावर पाऊस पडताच पाण्याचा निचरा होत नसल्याने तिथे तब्बल गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे पोलिस प्रशासनाने अनेकदा पत्रव्यवहार केले. बैठका घेत पाठपुरावा सुरू ठेवला होता. राजकीय नेत्यांनीदेखील याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी काम सुरू झाले आहे.
त्यामुळे ३१ मे पर्यंत पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे व हिंजवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी केले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग...
१) सूर्या अंडरपासकडून सेवा रस्त्याने वाकडनाका मार्गे सयाजी अंडरपासकडे जाणारी वाहने इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) इंडियन ऑइल चौकाकडून सेवा रस्त्याने वाकड नाकामार्गे सयाजी अंडरपास व वाकडगावाकडे जाणारी वाहतूक सावतामाळी मंदिर येथून वाकड उड्डाणपुलावरून इच्छित स्थळी जातील.
३) इंडियन ऑइल चौकाकडून सेवा रस्त्याने वाकडनाका सयाजी अंडरपास यू टर्न घेऊन वाकडनाका सातारा लेन मार्गे हायवेला जाणारी वाहतूक ही वाकड उड्डाणपुलावरून वाकडगाव यू टर्न घेऊन वाकड नाका सातारा लेन मार्गे महामार्गाने इच्छित स्थळी जाऊ शकतील.
४) इंडियन ऑइल चौक येथून वाकड नाकामार्गे सेवा रस्त्याने सयाजी अंडरपास मार्गे महामार्गाला जाणारी वाहने ही वरील मार्गे न जाता ती कस्तुरी चौक विनोदे वस्ती, भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.