
पुणे (Pune) : पुणे (Pune), पिंपरी चिंचवड शहर (PCMC) तसेच ग्रामीण भागात सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (Black Spots) संयुक्त सर्वेक्षण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दोन्ही महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि पोलिस या विभागांना दिली.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे आदी उपस्थित होते. बैठकीत 'ब्लॅक स्पॉट' दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला.
पुणे शहरात सर्वाधिक अपघात होतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली. एकात्मिक रस्ते अपघात माहिती प्रणाली अर्थात ‘आयरॅड’ वरील अपघातांच्या माहितीचे विश्लेषण करून अपघातांची कारणे व त्या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अपघात रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी करावयाच्या लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित कराव्यात. आवश्यक तेथे वेग नियंत्रणासाठी रम्बलर्स बसविणे, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंग, सूचना फलक, रस्त्यावरील परावर्तक, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी उपाय योजण्यात यावेत. यासाठी ब्लॅकस्पॉटनिहाय संयुक्त सर्वेक्षण करून उपाययोजना सुचवाव्यात. सर्वेक्षणासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ सामाजिक संस्थांचेही सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांच्या परिसरात ‘१०८‘ रुग्णवाहिका सेवेतील रुग्णवाहिकांची स्थायी थांब्याची ठिकाणे ठरविणे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात लवकरात लवकर पोहोचविण्याच्या दृष्टीने आपत्कालीन वाहतूक आराखडे तयार करणे, यादृष्टीनेही कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पुणे जिल्ह्यात ६३ ब्लॅक स्पॉट्स आहेत, असे यावेळी बहीर यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय तसेच ‘ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज' संस्थेच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.
‘हेल्मेटच्या वापराविषयी जनजागृती करा‘
पुणे शहरात २०२० पासून अपघातांच्या संख्येत सुमारे ११३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामध्ये दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हेल्मेटच्या वापराविषयी अधिकाधिक जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीत सांगितले.