.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे, ता. ३० : राडारोडा टाकताना निद्रितावस्थेत असलेली महापालिका आता पुराचा फटका बसल्यानंतर खडबडून जागी झाली आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास नदीकाठ परिसरात पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राडारोडा उचलण्यासाठी दिवसरात्र जेसीबी चालू ठेवण्याची नामुष्की प्रशासनाला ओढवली आहे. दोन दिवसांत डंपरच्या ३१२ फेऱ्यांमधून नदीपात्रातून राडारोडा बाहेर काढला आहे.
कर्वेनगर, वारजे, शिवणे भागात मुठा नदीत निळ्या पूररेषेत राडारोडा टाकण्यात आला आहे. मुठा नदीला २५ जुलैला आलेल्या पुरात सिंहगड रस्ता भागातील एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलनगर आदी भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी साहित्यासह वाहनांचे मोठे नुकसान झाले. व्यावसायिकांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. खडकवासला धरणातून जास्त पाणी सोडल्याने ही स्थिती ओढवली, असा आरोप केला जात असताना नदीपात्रातील अतिक्रमणांमुळेही हा पूर आला असल्याचे पुढे आले आहे.
कर्वेनगर येथे काही मंगल कार्यालयांनी त्यांच्या पार्किंगच्या व्यवस्थेसाठी निळ्या पूररेषेच्या आतमध्ये शेकडो डंपर राडारोडा टाकून मैदान तयार केले आहे. या राडारोड्यामुळे पाण्याला अडथळा निर्माण होऊन त्याचा फुगवटा एकतानगरी परिसरात निर्माण झाला. तळजाई टेकडीवरून येणाऱ्या नाल्यातील पाणी वस्तीमध्ये घुसले.
महापालिकेने हा राडारोडा काढण्यास सुरुवात केली. सोमवारी (ता. २९) कर्वेनगर ते शिवणेदरम्यान पाच ठिकाणी राडारोडा काढण्यास सुरुवात केली. एका दिवसात २०४ डंपर राडारोडा काढला. त्यामध्ये १५८ डंपर राडारोडा हा राजाराम पुलाजवळील एका मंगल कार्यालयाच्या जागेतून काढला होता. तेथे मध्यरात्री दीड वाजेपर्यंत या ठिकाणी काम सुरु होते. तर मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून पुन्हा कर्वेनगर आणि शिवणे येथे राडारोडा काढण्यास सुरुवात झाली. सायंकाळी सहापर्यंत कर्वेनगर येथील मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस निळ्या पूर रेषेतील राडारोडा काढण्यासाठी डंपरच्या ९६ फेऱ्या झाल्या असून येथील काम पूर्ण झाले आहे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.
५० नव्हे तर २५ डंपरचा वापर
राडारोडा काढण्यासाठी २५ जेसीबी आणि ५० डंपरचा वापर केला जात असल्याचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले होते. मात्र, प्रशासनाने दिलेल्या निवेदनात १२ जेसीबी आणि २५ डंपरचा वापर करण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्याचसोबत दोन कार्यकारी अभियंता, सहा कनिष्ठ अभियंता, ३७ चालक यात सहभागी झाले होते.
प्रत्येक डंपरसाठी २० मिनिटे
कर्वेनगर, शिवणे येथे नदीतील राडारोडा काढून तो डंपरमध्ये भरण्यास सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागत होता. कर्वेनगर येथे एकावेळी आठ जेसीबी आणि १२ डंपरचा वापर करण्यात आला. सुमारे अडीच मीटर खोल आणि ३०० फूट लांब असा निळ्या पूर रेषेतील भाग महापालिकेने मोकळा केला.
शिवणेत दोन जेसीबी
शिवणे येथील दांगटनगरमध्ये नदीपात्रात राडारोडा टाकला आहे. तो काढण्यासाठी दोन जेसीबी असल्याचे निदर्शनास आले. तर आठ डंपरमधून हा राडारोडा थेट वाघोलीतील खाणीत नेऊन टाकला जात आहे. त्यामुळे जेसीबी चालकांना डंपर येण्याची वाट पाहत बसावे लागत असल्याने येथील काम संथगतीने सुरु असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत निदर्शनास आले. प्रशासनाने सायंकाळपर्यंत येथून डंपरच्या १२ फेऱ्या झाल्या असल्याचे सांगितले.
मंगळवारी दिवसभरात राडारोडा काढण्यासाठी डंपरच्या १०८ फेऱ्या झाल्या. यातील शिवणे येथे १२ तर कर्वेनगर येथे ९६ फेऱ्या झाल्या आहेत. नदीपात्रात आता कोठेही निळ्या पूररेषेच्या आतमध्ये राडारोडा शिल्लक नाही. जागा मालकांना नोटीस देण्यात येणार आहेत.
- बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
आकडेवारी
कर्वेनगर, वारजे, शिवणे भाग - निळ्या पूररेषेत राडारोडा
१२ जेसीबी - राडारोडा काढण्यासाठी
२५ डंपर - राडारोडा काढण्यासाठी
२० मिनिटे - एक डंपर भरण्यास लागणारा वेळ
२०४ डंपर - सोमवारी झालेल्या फेऱ्या
१०८ - मंगळवारी झालेल्या फेऱ्या