.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Pune News पुणे : आषाढी वारी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी पुण्यात आलेले असताना खडकवासला जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झाला. याचा झटका महापालिकेला (PMC) बसल्यानंतर असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने थर्मल कॅमेरा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अन्य उपाययोजनाही सुरू केल्या आहेत.
शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन होण्याच्या आदल्या दिवशी खडकवासला जॅकवेल येथे शॉर्टसर्किट होऊन पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली. शहरात लाखो वारकरी मुक्कामी असताना त्यांना पाणी पुरवठा करताना तारांबळ उडाली. अनेक भागात पाणीही उपलब्ध झाले नाही. पावसाळ्यामध्ये वीज केंद्रात ओलावा निर्माण झाल्यानंतर शॉर्टसर्किट होण्याच्या घटना वारंवार घडतात.
खडकवासला जॅकवेल येथे शॉर्टसर्किट मोठ्या प्रमाणात झाले होते. असे प्रकार अन्य जलशुद्धीकरण केंद्रात घडू नयेत, वीज केंद्रातील तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी थर्मल कॅमेऱ्याचा वापर केला जाणार आहे.
या कॅमेऱ्यामुळे काही ठिकाणी लूज कनेक्शन असेल तर ते देखील कळते. सुमारे ५ लाख रुपयांचा कॅमेरा खरेदी करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या कॅमेऱ्यामुळे फायदा झाल्यास प्रत्येक जलशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र कॅमेरा खरेदी केला जाईल.
त्याचप्रमाणे हॅलोजन लॅम्प, हिटर, फ्लॅप लॅम्पही वीज केंद्रावर बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नसते, असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
का झाले शॉर्टसर्किट?
उन्हाळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना महापालिकेने एकदाही देखभाल दुरुस्तीसाठी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला नव्हता. पावसाळ्यापूर्वी एक दिवस देखभाल दुरुस्तीचे काम करणे आवश्यक होते, पण तसे न केल्यानेच खडकवासला जॅकवेल येथे शॉर्टसर्किट झाले, त्याचाच फटका ऐन वारीच्या दिवशी बसला आहे.