
पुणे (Pune) : पुणे महापालिकेत केशवनगर गाव सात वर्षांपूर्वी समाविष्ट झाले. दरम्यान, पालिकेने कोट्यवधी रुपयांचा कर नागरिकांकडून वसूल केला, परंतु त्याबदल्यात गावाला पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत. अर्ज, आंदोलन, हंडा मोर्चा काढून वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर लष्कर पाणीपुरवठा केंद्राला टाळे ठोको आंदोलन केले. त्यात सुमारे आठशे महिला-पुरुष सहभागी झाले होते.
केशवनगर परिसरात दिवसाआड कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा केला जातो. त्यात काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेने गेल्या काही महिन्यांपूर्वी १८ इंची जलवाहिनी टाकली, परंतु ती मुख्य जलवाहिनीला न जोडल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी धावाधाव करावी लागत असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यातूनच पाणीपुरवठा केंद्राला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस संदीप लोणकर यांनी केले.
विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, मुंढवा- केशवनगर परिसरातील शेकडो नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देत निषेध केला. केशवनगरवासियांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कामचुकार ठेकेदारांवर गुन्हे दाखल करणार असून, अधिकारी आणि ठेकेदारांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा लोणकर यांनी यावेळी दिला.
आमच्याकडून महापालिका लक्षावधी रुपयांचा कर वसूल करते, पण योग्य प्रमाणात पाणी दिले जात नाही. पाण्यासाठी हातातील कामे बाजूला ठेवून धावाधाव करावी लागते. महिन्याला हजारो रुपये पाण्याच्या टँकरवर खर्च करावे लागतात.
- श्वेता लोणकर, स्थानिक रहिवासी
तातडीने २० जुलैच्या आत १८ इंची पाइपलाइन मुख्य जलवाहिनीला जोडण्याचे काम पूर्ण करू. त्यानंतर गावचा पाणीप्रश्न मार्गी लागेल.
- सुभाष पावरा, अभियंता, लष्कर पाणीपुरवठा केंद्र