पिंपरी (Pimpri) : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणातील (PMRDA) अतिक्रमण विरोधी पथक व अभियांत्रिकी विभागातील १६ कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने त्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.
‘पीएमआरडीए’ कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकातील भ्रष्टाचाराबाबत नागरिकांनी यापूर्वी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याचप्रमाणे मध्यंतरी प्राधिकरणातील कंत्राटी कर्मचारी लाच लुचपत विभागाकडून झालेल्या कारवाईत देखील अडकले होते. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त म्हसे यांनी तत्कालीन विभाग प्रमुखांना पत्र देऊन कारवाई करण्याबाबत सूचना केली होती.
अतिक्रमण विरोधी पथकातील कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांनी ४ ते ६ कोटी तर, तहसीलदार म्हणून नेमणूक असलेल्या अधिकाऱ्याने तब्बल १५ कोटी रुपयांची माया गोळा केली असल्याचा संशय आहे. बांधकाम पाडण्याचे तसेच, वारंवार फोन करून लाच मागितल्याचा या सर्वांवर आरोप आहे.
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, ‘‘पीएमआरडीएच्या विविध विभागातील बेकायदेशीर कामांची महाराष्ट्र शासनाने ‘एसआयटी’ स्थापन करून, सखोल चौकशी करण्याची गरज आहे.’’
संबंधित कर्मचाऱ्यांच्याविषयी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कारवाई चालू आहे. कंत्राटी कर्मचारी असल्याने त्यांच्या संस्थेने त्यांना निलंबित केले आहे. ‘पीएमआरडीए’च्यावतीने त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
- सुनील पांढरे, सह आयुक्त, प्रशासन विभाग