पुणे (Pune) : विश्रांतवाडी येथील चौकात उड्डाणपुलाचे काम करताना मेट्रो प्रकल्पाला अडथळा होईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता महामेट्रोने (Mahametro) याबाबत स्पष्टीकरण देत मेट्रोचे पिलर उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गामुळे मेट्रो प्रकल्पाला अडथळा होणार नाही, असे सांगत या कामाला हिरवा कंदील दाखविला आहे.
विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. विश्रांतवाडी चौकातून मेट्रोही प्रस्तावित आहे.
उड्डाणपूल आणि भुयारी मार्गामुळे मेट्रो प्रकल्पासाठी जागा शिल्लक राहणार नाही, असा आक्षेप माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांनी घेतला होता.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे महापालिकेत बैठक घेतली. त्या बैठकीतही या पुलाच्या आराखड्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी मोहोळ यांनी पुलाच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश देत आक्षेपांबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने उड्डाणपूल व भुयारी मार्गाचा आराखडा तपासणीसाठी महामेट्रोकडे पाठविला होता. त्यानंतर या दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये मेट्रोने महापालिकेच्या या कामाचा अडथळा मेट्रोला होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. जेव्हा मेट्रोचे काम सुरू होईल तेव्हा पिलर घेण्यासाठी पुरेशी जागा या चौकात उपलब्ध आहे.
महापालिकेने महामेट्रोकडून विश्रांतवाडी चौकातील पुलाचा आराखडा तपासून घेतला. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पाला या उड्डाणपूल व भुयारी मार्गाचा अडथळा होणार नाही, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.
- श्रीनिवास बोनाला, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग