
पुणे (Manmad) : मनमाड-भुसावळ मार्गावर क्षमतेपेक्षा जास्त गाड्या सोडल्याचा फटका सोलापूरच्या प्रवाशांना बसला. अमरावतीहून पुण्याला येणारा रिकामा रेक मनमाड-भुसावळ मार्गावर ठिकठिकाणी थांबविण्यात आला. रेक शनिवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास पुण्याला पोहोचणे अपेक्षित होता, मात्र रात्री अकरापर्यंत पोहोचलाच नाही. रात्री साडेअकराच्या सुमारास रेक पुणे स्थानकावर आला. त्यांनतर हुतात्मा एक्स्प्रेस सोलापूरच्या दिशेने रवाना झाली. तब्बल साडेपाच तासांचा उशीर झाल्याने प्रवासी संतप्त झाले होते.
रेल्वे प्रशासनाने मार्गाच्या क्षमतेचा विचार न करताच विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. गाड्यांना धावण्यासाठी मार्गच (पाथ)नसल्याने प्रचंड उशीर होत आहे. शुक्रवारी (ता. १०) सकाळी साडेअकराच्या सुमारास पुण्याहून-अमरावतीला निघालेली एक्स्प्रेस रात्री एक वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र रात्री तीन वाजून १४ मिनिटांनी रेल्वे अमरावती स्थानकावर दाखल झाली. त्यानंतर रात्री तीन वाजून ५५ मिनिटांनी रिकामा रेक पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. पुण्याला पोहोचण्यास शनिवारी रात्री साडेअकरा वाजले.
दिवाळीच्या काळात घर गाठण्याच्या ओढीने प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त गाड्या सोडल्या खऱ्या; मात्र त्याचे नियोजन प्रशासनाला जमले नाही. गाड्यांना मोठ्या प्रमाणात उशीर होण्याचा प्रकार घडत आहे. प्रवासी फलाटावर ताटकळत बसत राहतात. गाड्यांना उशीर झाल्याने स्थानकावरच्या गर्दीतही वाढ होत आहे. रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे.
रिकाम्या रेकचा प्रवास १९ तासांचा
भुसावळ रेल्वे प्रशासनाने अमरावती-पुणे एक्स्प्रेस रद्द केली. मात्र त्याचा रिकामा रेक पुण्यासाठी शनिवारी पहाटे चारच्या सुमारास निघाला. गाडीत प्रवासी नसल्याने रेल्वे प्रशासनाने विविध सेक्शनमध्ये रेकला थांबविले. भुसावळ विभागाने दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी रेकला सोलापूर विभागाकडे सुपूर्द केला. मात्र त्यानंतरही रेकला थांबविण्यात आले. याचा फटका सोलापूरच्या प्रवाशांना बसणार हे माहीत असतानाही रेकला प्राधान्याने चालविला नाही. रात्री दहाच्या सुमारास रेक दौंड स्थानकावर दाखल झाला. पुण्याला पोहोचण्यास रात्री ११ वाजले. त्यामुळे रिकाम्या रेकचा प्रवास तब्बल १९ तास सुरू होता.
एसटी बसला प्रचंड गर्दी असल्याने मी हुतात्मा एक्स्प्रेसने सोलापूरला जाणार होतो. मात्र रेल्वेला खूपच उशीर झाल्याने मला नाइलाजाने अन्य वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागला. प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
- सौरभ पवार, प्रवासी
मनमाड-भुसावळ सेक्शनमध्ये गाड्यांची संख्या जास्त असल्याने रिकाम्या रेकला पुण्याला पोहोचण्यास उशीर झाला. परिणामी हुतात्मा एक्स्प्रेसला सोलापूरला पोहोचण्यास उशीर झाला.
- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई