
वाघोली (Wagholi) : पुणे महापालिका (PMC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए-PMRDA), सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, वाघोली पोलिस यांनी संयुक्तपणे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सुमारे २० हजार चौरस फूट अतिक्रमणांवर वाघोलीत नुकताच हातोडा टाकला. यामध्ये शेड, ओटे, फलक, बांधकामे आदींचा समावेश होता.
वाघोलीत वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या वेळी आयुक्तांनी परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी संयुक्तपणे तत्काळ अतिक्रमण कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दोन दिवसांत सुमारे वीस हजार चौरस फूट आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर लोणीकंद वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण कारवाईदरम्यान वाहतूक नियंत्रण करण्यात आली. ‘पीएमआरडीए’चे अभियंता विष्णू आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
नुकसान नको म्हणून अनेक व्यावसायिकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेतले. दोन दिवस झालेल्या अचानक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या कारवाईत सहा ‘जेसीबी’सह सुमारे ५० बिगारी, विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते.
आव्हाळवाडी फाटा ते डिकॅथलॉनपर्यंत, तसेच आव्हाळवाडी रस्ता परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान नागरिकांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींना फोन करून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. किरकोळ विरोध वगळता कारवाई शांततेत पार पडली.
आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, वाघोलीत वाहतूक कोंडीचा खूपच गंभीर प्रश्न आहे. अनेक अतिक्रमणे वाहतुकीस अडथळा ठरत होती. त्यानुसार संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. नागरिकांनी अशी अतिक्रमणे करू नयेत. ती झाल्यास महापालिकेनेही तत्काळ कारवाई करावी.
...अन् ‘आमदार चौका’चा फलक जमीनदोस्त
आव्हाळवाडी फाट्यापुढे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे कार्यालय आहे. त्या रस्त्यावर ‘आमदार चौक’ असा मोठा फलक लावण्यात आला होता. त्याबाबत नागरिकांची उत्सुकता होती, मात्र तोही फलक जमीनदोस्त करण्यात आला.
रस्ता त्वरित करावा
केवळ अतिक्रमण कारवाई करून उपयोग होणार नाही, तर कारवाईनंतर प्रशासनाने तत्काळ रस्ता करून मार्ग वाढवावा, अन्यथा आठवड्यात पुन्हा अतिक्रमणे व वाहतूक कोंडीचा प्रश्न उभा राहील, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली.