पुणे (Pune) : यंदाच्या वर्षी पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याचा जपून वापर केला जात आहे. महापालिकेने (PMC) बांधकाम व्यवसायिकांना बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर बंद करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात (STP) शुद्ध केलेले पाणी वापरण्याची सक्ती केली आहे. मात्र, त्यात टाळाटाळ केली जात आहे.
यासाठी बांधकाम व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीत हे पाणी बांधकामासाठी अयोग्य आहे, बांधकाम कमकुवत होण्याची भीती व्यावसायिकांनी बोलून दाखविली आहे. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात शुद्ध केल्या जाणाऱ्या पाण्याच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेने मे २०२३ पासून शहरातील बांधकामांसाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी वापरण्याची सक्ती केली. त्यासाठी सात ठिकाणी टँकर भरणा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. टँकरची नोंदणी करण्यासाठी ॲपही विकसित केले आहे. त्यामुळे टँकर ऑनलाइन मागविले जात होते. महापालिकेने सक्ती केल्यानंतर मे, जून, महिन्यात टँकरची दैनंदिन मागणी २०० पेक्षा जास्त होती. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर नोंदणी घटली.
खडकवासला धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची सूचना केली आहे. त्यातच बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे यासंदर्भात बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची बैठक नुकतीच महापालिकेत झाली. यात हे पाणी अयोग्य असल्याचे सांगितल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने सुचविलेल्या उपाययोजना
तक्रारी ऐकून घेऊन महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याची गुणवत्ता प्रयोगशाळेकडून तपासणी जाईल. आरसीसी सल्लागारांशीही बैठक घेऊन बांधकामासाठी कसे पाणी आवश्यक आहे?, शुद्ध केलेल्या पाण्यातील घटकांचे प्रमाण काय असावे?, ते निश्चित करून बांधकामासाठी योग्य पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. यासंदर्भात आता पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे.
बांधकामासाठी ‘एसटीपी’चे पाणी वापरावे, यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा केली. त्यांनी पाण्याच्या दर्जाबाबत काही तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या अडचणी दूर करून, बांधकामासाठी योग्य पाणी उपलब्ध करून दिले जाईल. मात्र, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी होऊ नये, असे बैठकीत सांगितले आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग
हे आहेत बांधकाम व्यावसायिकांचे आक्षेप
- पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी
- क्लोरिनचे प्रमाण जास्त असल्याने लोखंडाला गंज लागण्याची शक्यता
- अन्य रासायनिक घटकांमुळे बांधकाम कमकुवत होण्याची शक्यता
- पाणी वापरताना कामगारांना त्रास होत आहे.