
पुणे (Pune) : ‘पीएमपीच्या ‘इलेक्ट्रिक’ बस ‘चार्जिंग’अभावी मार्गावरच बंद पडल्याने प्रवाशांना फटका बसतो.
यावर प्रशासनाने ‘सीएनजी’चा पर्याय काढला आहे. दुपारच्या सत्रात गर्दी कमी असताना ‘इ’ बस पूर्ण क्षमतेने चार्ज केल्या जातील. तेव्हा ‘सीएनजी’ बसच्या फेऱ्या होतील.
यासाठी ‘इ’ आगारात २५ टक्के ‘सीएनजी’ बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हा उपाय भेकराईनगरच्या आगारात प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बस बंद पडण्याच्या तक्रारी कमालीच्या घटल्या आहेत.
‘इ’ बस पूर्ण क्षमतेने ‘चार्ज’ होण्यासाठी चार तासांचा वेळ लागतो. पूर्ण ‘चार्ज’ झालेली बस सकाळच्या सत्रात सुमारे ११० ते ११५ किलोमीटर धावते. दुपारच्या सत्रात ‘बॅटरी’ची क्षमता कमी होते.
बसच्या फेऱ्या सुरू असल्याने आगारात नेऊन त्या ‘चार्ज’ करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी फेरी सुरू असतानाच ‘बॅटरी’ संपून बस मार्गावर बंद पडते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. या उपायाचा सर्व आगारांत अवलंब झाल्यास प्रवाशांचा प्रवास ‘ब्रेक’ होणार नाही.
‘सीएनजी’ची मात्रा
‘इ’ बस दुपारच्या सत्रात पूर्ण क्षमतेने धावावी म्हणून ‘चार्जिंग’साठी ४५ मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे, मात्र अनेकदा रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे चालक बस ‘चार्ज’न करताच फेऱ्या सुरू ठेवतात.
‘चार्जिंग’साठी बस जास्त वेळ थांबली तर प्रवासी सेवेवर परिणाम होतो. अशावेळी दुपारच्या सत्रात ‘सीएनजी’ बस वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे फेऱ्या रद्द होणाऱ्या बसचे प्रमाणही कमी होईल. परिणामी प्रवाशांची ‘सीएनजी’ बसमधून सोय होईल.
एप्रिलमध्ये दोन ‘इ’ आगार कार्यान्वित
हिंजवडी फेज-२ व चऱ्होली येथील ‘इ’ आगाराचे काम पूर्ण झाले आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या दोन्ही आगारांचे उद्घाटन होईल व तेथून प्रवासी सेवा सुरू होईल. ही ‘पीएमपी’ची अनुक्रमे १६ व १७ क्रमांकांची आगार असतील. ‘इ’ आगारांची संख्या सात होईल. हिंजवडी आगारातून ३०, तर चऱ्होली आगारातून ५० ‘इ’ बस धावतील.
पाचही ‘इ’ आगारांत ‘सीएनजी’ बस
पीएमपीची पाच ‘इ’ आगार आहेत. यात पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी यांचा समावेश आहे. यातून ४९० ‘इ’ बस सेवा देतात. यातील काही बस जुन्या झाल्या आहेत. याशिवाय ‘चार्जिंग’मधील तांत्रिक अडचणींमुळे त्या दुपारी बंद पडतात. भेकराईनगरप्रमाणे इतर चारही आगारांत ‘सीएनजी’ बसची सेवा सुरु होईल. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
‘इलेक्ट्रिक’ बस बंद पडण्याचे प्रमाण आणि पर्यायाने प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर तत्काळ प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यामुळे पहिल्या टप्यात भेकराईनगर ‘इ’ आगारात २५ टक्के ‘सीएनजी’ बस समाविष्ट केल्या. यानंतर बाणेर आणि निगडी या आगारांतही प्रत्येकी २५ टक्के ‘सीएनजी’ बस उपलब्ध केल्या जातील.
- दीपा मुधोळ मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे