
पुणे (Pune) : वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या बालभारती - पौड फाटा रस्त्याला (Balbharti - Paud Phata Road) विरोध होत असताना पुणे महापालिकेने (PMC) हा रस्ता नेमका कुठून जातो हे नागरिकांना स्पष्टपणे कळावे यासाठी सिमेंटचे खांब उभारणीचे काम केले जाणार आहे.
विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रस्तावित केला आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असताना या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी नागरिकांना विरोध सुरू केला आहे.
रस्त्यासाठी टेकडी फोडली जाणार, वृक्षतोड केली जाणार, त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होणार आहे. पाण्याचे झरे आटणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकल्पास पर्यावरण प्रेमी संघटना, संस्था, राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया सध्या थांबलेली आहे.
बालभारती पौडफाटा रस्ता नेमका वेताळ टेकडीच्या कोणत्या भागातून जाणार आहे हे नागरिकांनी नकाशावर पाहिले आहे. पण प्रत्यक्षात या रस्त्याचा आराखडा कसा आहे हे नागरिकांना कळावे यासाठी महापालिकेने वेताळ टेकडीवर सिमेंटचे खांब लावण्याचा निर्णय घेतला आहे.
हा रस्ता ३० मीटर रुंदीचा आणि २.१ किलोमीटर लांबीचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येक २० मीटर अंतरावर सिमेंटचे खांब रोवले जाणार आहेत. सध्या सिमेंटचे खांब या ठिकाणी नेण्याचे काम सुरू असून, पुढील दोन दिवसांत खांब लावणे सुरू होईल.
बालभारती पौड फाटा रस्ता नेमका कसा आहे, तो कुठून कसा जाणार आहे, हे नागरिकांना प्रत्यक्ष जागेवर कळणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंटचे खांब लावले जाणार आहेत. त्यातून नागरिकांचे गैरसमज दूर होण्यास त्यातून मदत होईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका