
पुणे (Pune) : उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळू नये अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली असताना ही दोन्ही गावे महापालिकेतून (PMC) वगळण्यास शहर सुधारणा समितीमध्ये निर्णय घेण्यात आला. मात्र, कचरा डेपोची जागा ही महापालिकेकडेच राहणार आहे.
महापालिकेमध्ये उरुळी देवाची व फुरसुंगी ही दोन्ही गावे २०१७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. येथील मिळकतींना अव्वाच्या सव्वा मिळकतकर लागल्याने तेथील व्यापारी व इतर नागरिकांनी कर कमी करावा यासाठी प्रयत्न केला होता. पण तो कमी होत नसल्याने ही गावे महापालिकेतून वगळावीत यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यासंदर्भात माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात बैठक घेऊन गावे वगळण्याचा निर्णय करून घेतला व या दोन गावांची नगर परिषद करण्याचे जाहीर केले होते.
या बैठकीचे इतिवृत्त नुकतेच महापालिकेला प्राप्त झाले असून, यामध्ये ही गावे वगळण्याचे प्रस्ताव मंजूर करून तो सरकारकडे पाठवावा असे आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी शहर सुधारणा समितीची बैठक घेऊन गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
गावे न वगळण्याची मागणी
ही गावे महापालिकेमध्ये समाविष्ट केल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. टीपी स्कीम, प्रारूप विकास आराखडा, रस्ते, पाणी पुरवठा, जलशुद्धीकरण योजना, मलःनिसारण वाहिनी, शैक्षणिक व आरोग्य सुविधा आदी कामे केली आहेत. टीपी स्कीममुळे गावांचा सुनियोजित विकास होणार आहे.
सरकारने मिळकत कर कमी करून ही गावे महापालिकेतच ठेवावीत, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी नुकतीच केली होती. मात्र, राज्य सरकारकडूनच गावे वगळण्याचा निर्णय घेऊन तो पाठवावा, असे आदेश आल्याने शहर सुधारणा समितीमध्ये त्यास मान्यता दिली.