Pune News : पुणे महापालिकेला आपल्याच कर्तव्याचा विसर; मुसळधार पावसानंतर पुण्यात काय झाले?

Pune Rain
Pune RainTendernama

Pune Rain News पुणे : शहरात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. रस्त्यांना नदी स्वरूप आले, तर चौकाचौकात प्रचंड पाणी जमा झाल्याने भयानक स्थिती निर्माण झाली होती. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरील पाणी ओसरले. पण पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेली खडी, माती, वाळू रस्त्यावर पसरल्याने दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

तसेच धूळ उडत असल्याने चालकांना वाहन चालविणे अवघड होत आहे. परंतु, महापालिका (PMC) क्षेत्रीय कार्यालये आणि मलनिःसारण विभागात हद्दीचा वाद लागल्याने रस्ते स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Pune Rain
Mumbai To Shrivardhan : कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! मुंबई ते श्रीवर्धन अवघ्या अडीच तासांत

शहरातील रस्ते झाडण्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांची टेंडर काढते. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. रोज रस्ते झाडणे, स्वच्छ करणे, कचरा उचलणे अशी कामे ही ठेकेदाराकडून करून घेतली जातात. त्याच प्रमाणे महापालिकेचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी रस्ता झाडण्याचे काम करतात.

मलनिःसारण विभागाकडून रस्त्यावरील पावसाळी गटार, सांडपाण्याचे गटार याची स्वच्छता केली जाते. चेंबर व त्याच्या भोवती जमा होणारा कचरा, माती, खडी उचलून टाकणे ही पावसाळी गटार साफ करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी आहे.

शहरात ४ जून रोजी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे बहुतांश सर्वच भागातील रस्ते पाण्याखाली गेले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात खडी, माती, वाळू यासह अन्य कचरा वाहून आला. रस्त्यावर ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे अशा ठिकाणी माती, खडी जमा झालेली होती.

त्यानंतर शनिवारी (ता. ८) पुन्हा एकदा पावसाने पुण्याला तडाखा दिला. अनेक भागात घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले, पावसाळी गटारांचे चेंबर कचऱ्याने भरले. त्यावेळी वेळेवर मदत न मिळाल्याने आपत्ती व्यवस्थापनाची पोलखोल झाली. पाऊस ओसरल्यानंतर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली.

Pune Rain
Pune News : अवघ्या 2 महिन्यांपूर्वीचा लाखोंचा खर्च का गेला वाया?

शहरात चेंबर दुरुस्त करणे, कचरा उचलणे, पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा करणे, गाळ काढणे अशी कामे महापालिका करत आहे. पण रस्ते झाडण्यासाठी मोठी यंत्रणा असूनही खडी, माती काढली जात नसल्याने रस्त्यावर धूळ उडत असल्याने वाहनचालकांना गाडी चालविताना त्रास होत आहे. शिवाय रस्त्यात पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे, वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

क्षेत्रीय कार्यालयाकडे झाडणकाम करणारे कर्मचारी माती, खडी झाडून काढत नाहीत. राडारोडा उचलण्यासाठी जी टेंडर काढली आहे, त्यांच्याकडून हे काम करून घेतले जाते. आमचे हे काम नाही असे सांगून हात झटकले जात आहेत.

तर पावसाळी गटार साफ करणाऱ्या ठेकेदारांकडून आम्ही केवळ चेंबर स्वच्छ करणार असे सांगून काम टाळले जात आहे. महापालिका प्रशासनाचे हे सामुहिक काम करताना प्रत्येक विभाग काम टाळत असल्याने त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

Pune Rain
Mumbai Coastal Road : थरार...मुंबई कोस्टल रोडचा!

क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळाकडून रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता, झाडणकाम केले जात आहे. पावसामुळे वाहून आलेली माती, खडी उचलण्यास सांगितले आहे. रस्ते लवकर खडी व माती मुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा सूचना दिल्या जातील.

- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com