पुणे (Pune) : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गाजावाजा होऊन सुरू झालेला मेट्रो प्रकल्प (Pune Metro) धीम्या गतीने पुढे सरकत आहे. नव्या वर्षात प्रवासी संख्या वाढविण्याचे आव्हान महामेट्रोपुढे असेल. पिंपरी-चिंचवड-निगडी मार्गाच्या टेंडर प्रसिद्ध झाल्या असून स्वारगेट-कात्रज मार्ग केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मेट्रोचे एक पाऊल पुढे पडले आहे. आता प्रवासी संख्या वाढविण्यावर महामेट्रोने भर दिला आहे.
शहरात वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या ३३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. यापैकी २३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, त्यावर मेट्रो धावत आहे. सध्या वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान मेट्रो सुरू आहे. दोन्ही मार्गांचे अंतर मर्यादित असल्यामुळे अपेक्षित प्रवासी संख्येचे उद्दिष्ट मेट्रोला गाठता आलेले नाही. त्यातच रूबी हॉल-रामवाडी मार्गावर येरवड्याजवळ आलेल्या अडथळ्यामुळे या टप्प्याला विलंब होत आहे.
मेट्रो स्थानकांपासून प्रवाशांना प्रवासाची सुविधा देण्यासाठी महामेट्रो आणि ‘पीएमपी’ने फिडर रूट आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात ८ स्थानकांपासून त्याची अंमलबजावणी होईल. तसेच स्थानकापासून १ ते २ किलोमीटरच्या अंतरासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मदतीने शेअर रिक्षा सुरू आहे. परंतु या योजनेला फारसे यश मिळालेले नाही.
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न
प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामेट्रोने मार्गांभोवतालच्या शाळा, महाविद्यालये, उद्योग केंद्र, रुग्णालये आदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मेट्रोमार्गांजवळ स्थानकाचे फलक लावले आहेत. तसेच ई-रिक्षा, ई-सायकल आदी पर्यायही प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. सुरू असलेल्या दोन्ही मार्गांचे विस्तारीकरण एप्रिलपर्यंत पूर्ण झाल्यावर मेट्रोची प्रवासी संख्या दुप्पट होईल, अशी महामेट्रोची अपेक्षा आहे.
या वर्षी काय झाले
- गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल (२. ३८ किलोमीटर) मार्ग कार्यान्वित
- फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय (६. ९१ किलोमीटर) मार्ग कार्यान्वित
- पुणे मेट्रो कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या - २५ हजार ९०८
- विद्यार्थी पास (३० टक्के सवलत) - ४ हजार ९४८
- पिंपरी-चिंचवड-निगडी मार्ग केंद्र सरकारकडून मंजूर - अंतर ४. ५ किलोमीटर
- स्थानके १) चिंचवड २) आकुर्डी ३) निगडी ४ भक्ती-शक्ती
- मार्ग कार्यान्वित होण्यासाठी लागणारा कालावधी - ३ वर्षे
- मार्गासाठीचा खर्च - ९१० कोटी रुपये
- स्वारगेट-कात्रज मार्गाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे (पीआयबी) दाखल
- केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर कामाला प्रारंभ
मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या वर्षात संपूर्ण ३३ किलोमीटरचा प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यामुळे मध्य पुण्यातील विशेषतः महात्मा फुले मंडई, बुधवार पेठ, स्वारगेट आदी भागांतील प्रवाशांना त्याचा फायदा होईल. तसेच पिंपरी-चिंचवड-निगडी मार्गाचेही काम सुरू होईल. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. नवे वर्ष मेट्रोसाठी महत्त्वाचे ठरेल.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो