
पुणे (Pune): आचार्य आनंदऋषिजी महाराज चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) झालेली वाहतूक कोंडी, तर पुलावर कार्यकर्ते व नेत्यांची गर्दी, त्या गर्दीतही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर येताच झालेली जोरदार घोषणाबाजी, अशा वातावरणात औंधकडून शिवाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी अवघ्या चार मिनिटांत उरकले.
औंधकडून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, हेमंत रासने, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह माजी नगरसेवक, दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशखिंड रस्त्यावर ‘पीएमआरडीए’ने मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुमजली उड्डाणपुलाचा एक टप्पा असलेल्या औंधकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
चौकात होणारी कोंडी लक्षात घेऊन याच्या उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. त्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक चतुःशृंगी पोलिस ठाण्याकडून विद्यापीठाच्या आतून वळविली होती. सायंकाळी पाचपासूनच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाच्या ठिकाणी जमा झाल्याने पुलावर गर्दी झाली.
साडेसहाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सात वाजून एक मिनिटांनी आले. गर्दीमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पुलावर चालणेदेखील मुश्किल झाले होते. तशा गर्दीतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोनशिला, तसेच पुलावर लावलेला पडदा खुला केला आणि अवघ्या चार मिनिटांत (७.०५ मिनिट) ते कार्यकस्थळावरून निघून गेले.
चार मिनिटांसाठी लाखोंचा खर्च
कार्यक्रमासाठी पुलावर छोटे व्यासपीठ, येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुर्च्या, रेडकार्पेट, पावसामुळे मंडप टाकला होता. तसेच पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई, झेंडूच्या फुलांच्या माळा, ढोल-ताशा पथक, सनईवाले अशी सर्व व्यवस्था केली होती. मात्र, नेत्यांनी कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात दिलेला वेळ पाहिल्यानंतर केवळ चार मिनिटांच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्च कशासाठी? अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. उद्घाटनांनतर पूल खुला करण्यात आला. मात्र, लगेच पुलावरील मंडप काढण्यासाठी पुन्हा बंदही ठेवण्यात आला.