
पुणे (Pune) : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या एका खांबाच्या शास्त्रीय तपासणीमध्ये काही दिवसांपूर्वीच त्रुटी आढळल्या होत्या. त्या खांबाचा खराब भाग नुकताच काढून टाकण्यात आला, तसेच तेथे नव्याने सिमेंट कॉंक्रिट करण्याच्या कामाला देखील महापालिकेने तत्काळ सुरवात केली.
महापालिका प्रशासनाच्या वतीने सिंहगड रस्त्यावर दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृह या मार्गावरील या दुहेरी पुलासाठी १३५ कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार असून, त्यासाठी एकूण ७० खांब उभारण्यात येणार आहेत. खांब उभारणीचे काम मागील काही दिवसांपासून वेगात सुरू आहे.
दरम्यान, महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून उड्डाणपुलाचे काम केले जात असल्याने त्यांच्याकडून पुलाच्या कामाची विविध टप्प्यांवर शास्त्रीय पद्धतीने तपासणी केली जाते. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी संबंधित पुलाच्या कामाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पुलाच्या कॉंक्रिटमध्ये त्रुटी आढळल्या.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने सल्लागारामार्फत तपासणी केली, तेव्हा संपूर्ण पूल पाडण्यापेक्षा संबंधित पुलाचा खराब काम झालेला भाग काढून तेथे नव्याने काम करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यानुसार पुलाचा काही भाग काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन मीटर भाग हटविला
महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा ‘ग्रेडेशन कॉंक्रिट’नुसार शास्त्रीय तपासणी करून निश्चित केला जातो. त्यामध्ये सिमेंट कॉंक्रिटच्या कामाचा ‘एम ३०’ इतका गुणात्मक दर्जा असणे आवश्यक असते. संबंधित खांबाची शास्त्रीय तपासणी केली, तेव्हा त्याचा गुणात्मक दर्जा ‘एम २९.६’ अशा प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले.
खांबाचे सिमेंट कॉंक्रिट काही प्रमाणात खराब असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, सल्लागारांच्या सल्ल्यानुसार, महापालिकेने खांबाचा तीन मीटरचा भाग काढून तेथे नव्याने काम सुरू केले आहे, असे विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय वायसे यांनी सांगितले.