
पुणे (Pune) : फुरसुंगी आणि उरुळी देवाची (Fursungi and Uruli Devachi) या दोन गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. लोकसंख्येनुसार ‘ब’ वर्ग नगरपालिका करता येऊ शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन गावांबाबतचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात गेला असून, त्यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे २०१७ मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा दावा करत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ६ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत केली होती.
त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे महापालिका हद्दीत वगळण्याचे आणि या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन केले होते. महिनाभराच्या मुदतीत जिल्हा प्रशासनाकडे साडेचार हजारांहून अधिक हरकती-सूचना प्राप्त झाल्या होत्या.
दरम्यान, प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून हवेली प्रांतांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याकडून प्राप्त हरकती, सूचनांवरील सुनावणी पूर्ण करून १९ जूनला जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा अहवाल प्राप्त झाला. परंतु पालख्या पुणे जिल्ह्यात असल्याने जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी त्या कामात होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी २१ जूनला अभिप्रायसह आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.
नगरपालिकेसाठी नागरिक सकारात्मक
राज्य सरकारच्या या निर्णयावर सुनावणीदरम्यान ४ हजार ६७९ पैकी साडेचार हजार नागरिक गैरहजर राहिले. मात्र त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले होते. महापालिका हद्दीत समावेश झाल्यावर निधी उपलब्ध होऊ शकतो. महापालिकेकडून तातडीने विकास आराखडा होऊ शकतो. महापालिकेने या गावांमध्ये नगर रचना योजना जाहीर केली आहे. ती रद्द होऊ शकते. त्यामुळे ही गावे महापालिकेच्या हद्दीतच ठेवावीत, अशी बाजू २ हजारांहून अधिक नागरिकांनी मांडली होती.
स्वतंत्र नगरपालिकाही या हद्दीचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करू शकते. विकासकामांसाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र निधी मिळू शकतो. चांगले प्रशासन देता येऊ शकते, त्यामुळे या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, असे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन २ हजार ३०० हून अधिक नागरिकांनी केले होते. त्यावर जिल्हा प्रशासनाने या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
गावांची लोकसंख्या
दोन्ही गावांची मिळून एकूण लोकसंख्या ः ७५ हजार ४०५
फुरसुंगी गावची लोकसंख्या ः ६६ हजार २
उरुळी देवाची गावची लोकसंख्या ः ९ हजार ४०३
‘ब’ वर्ग नगरपालिकेसाठी लोकसंख्येसाठीची अट ः ७५ हजार
फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन्ही गावांची मिळून नगरपालिका स्थापन करण्यासंदर्भात मागविण्यात आलेल्या हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन त्याबाबतचा अहवाल अभिप्रायासह राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यावर अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी