पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने त्याचा फटका समान पाणीपुरवठा योजनेच्या कामालाही बसला आहे. नेमकी जलवाहिनी टाकायची कुठून हेच स्पष्ट होत नसल्याने जवळपास वर्षभरापासून काम ठप्प आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई असलेल्या कोंढवा बुद्रुक, उंड्री, महंमदवाडी येथील नागरिकांना टँकरसाठी दर महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत.
महापालिकेकडून २०१८ पासून कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. हा रस्ता ८४ मीटर रुंद केला जाणार होता, त्यानुसार संबंधित विभागाने समान पाणीपुरवठा योजनेतून रस्त्याच्या कडेने १ हजार एमएमची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी नेण्यात येणार असून, राजस सोसायटीजवळ पंपिंग स्टेशन बांधले जाणार आहे. त्यामुळे पुढच्या भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. तसेच महंमदवाडी, कोंढवा या भागात पाण्याच्या टाक्या बांधून तयार झालेल्या आहेत.
पथ विभागाने कात्रज-कोंढवा रस्त्याचे ८४ मीटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला. पण जागामालकांनी रोख स्वरूपात मोबदला मागितल्याने त्यासाठी सुमारे ७५० कोटी रुपये लागणार होते. एवढा निधी महापालिकेकडे नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. त्यावर तोडगा म्हणून सद्यःस्थितीत ५० मीटर रस्ता करण्याचा निर्णय घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र राजस सोसायटी ते शत्रुंजय मंदिरादरम्यान अनेक भागांतील जागा ताब्यात आलेल्या नाहीत.
पाणीपुरवठा विभागाने काही ठिकाणी ८४ मीटर रुंदीनुसार जलवाहिनी टाकली आहे, तर आता काही ठिकाणी ५० मीटरच्या रुंदीला जलवाहिनी टाकावी लागणार आहे. मात्र भविष्यात रस्ता पुन्हा ८४ मीटरचा केला तर ५० मीटर रुंदीवर टाकलेली जलवाहिनी रस्त्याच्या मध्यभागी येण्याची शक्यता आहे. तसेच अनेक ठिकाणी जलवाहिनी वेडीवाकडी टाकली जाणार असल्याने पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. मात्र या रस्त्यावरील काम एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ठप्प आहे.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, ‘‘कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, उंड्री, महंमदवाडी, एनआयबीएम रस्ता या भागात तीव्र पाणीटंचाई आहे. काही भागांत अर्धा ते पाऊण तास पाणी येते, तर काही भागांत पाणीच येत नसल्याने नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. त्यावर हजारो रुपये खर्च होत आहेत. प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही पाणीपुरवठ्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही.’’
टाकी दाखवून विकले फ्लॅट
महंमदवाडी, एनआयबीएम रस्ता येथे समान पाणीपुरवठा योजनेतून तीन टाक्या बांधल्या असल्या तरी त्यात पाणी नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही. मात्र या भागातील बांधकाम व्यावसायिकांनी या पाण्याच्या टाक्या ग्राहकांना दाखवून ‘महापालिकेचे पाणी तुम्हाला थेट मिळणार आहे’’ असे सांगून लाखो रुपयांचे फ्लॅट विकले आहेत. पण तेच नागरिक आता दर महिन्याला लाखो रुपये टँकरवर खर्च करत आहेत. महापालिकेच्या धोरणामुळे बिल्डरांचा फायदा तर नागरिकांचे नुकसान झाले आहे, असा आरोप बाबर यांनी यांनी केला.
कोंढवा बुद्रुक, महंमदवाडी यासह इतर भागांत समान पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला जाणार आहे. मात्र कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात भूसंपादनाचे अडथळे आले. आता रस्त्याची रुंदी ८४ मीटरवरून ५० मीटर केली आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या कामात अडथळे आले आहेत. ८ ते १० ठिकाणचे काम बाकी असून, ते पूर्ण झाल्यानंतर पुरेसे पाणी उपलब्ध होईल.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग