
पुणे (Pune) : रेल्वे प्रशासनाकडून साधू वासवानी उड्डाणपुलाचा उर्वरित भाग पाडण्यासाठी तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतर आता महापालिका (PMC) प्रशासनाकडून येत्या दोन ते तीन दिवसांत पुलाचा पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील भाग पाडण्यास सुरवात केली जाणार आहे. त्यापूर्वी पुलाखाली असलेल्या झोपडपट्टीधारकांचे महापालिका प्रशासनाकडून स्थलांतर केले जाणार आहे.
कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पुलास पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पाहणीत निघाला होता. त्यानंतर हा पूल पाडून तेथे नवीन पूल उभारणी करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे नवीन पुलाच्या कामाचे भूमीपूजन होऊनही प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नव्हती.
दरम्यान, मे महिन्यात अडथळ्यांची शर्यत पार करून पुलाचा कोरेगाव पार्कच्या बाजूकडील भाग पाडण्याचे काम सुरू झाले होते. तर, पुणे कॅन्टोन्मेंटच्या बाजूकडील पुलाचा भाग पाडण्याच्या कामाला रेल्वेची मंजुरी मिळणे बाकी होते.
मागील आठवड्यात रेल्वेने तत्त्वतः मंजुरी दिली. त्यानंतर आता येत्या दोन ते तीन दिवसांत पुढील पाडकाम सुरू करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहे.
पुलाचा पुणे कॅन्टोन्मेंटकडील भाग पाडण्याचे काम तीन दिवसांत होईल. त्यापूर्वी पुलाखाली काही झोपड्या आहेत. या झोपडीधारकांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. संबंधित पुलाचे ४० टक्के पाडकाम झाले आहे. पुलाच्या कामासाठी ८० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलाची लांबी ५४ मीटर इतकी आहे.
- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प विभाग