
पुणे (Pune) : चाकण, आळंदी आणि खेड-राजगुरुनगर या तीन नगरपरिषदांसह त्यांच्या लगतची सुमारे ५० गावे मिळून नव्याने महापालिका स्थापन करण्यास जिल्हा प्रशासनासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएने अनुकूलता दर्शविली आहे. राज्य सरकारकडून त्यास मान्यता मिळाल्यास पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका अस्तित्वात येणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश झाला. त्यामुळे महापालिकांची हद्दवाढ झालेली आहे. या दोन्ही महापालिकांच्या हद्दीत नव्याने आखणी केलेल्या गावांचा समावेश करणे योग्य होणार नाही. त्यामुळे चाकण, आळंदी आणि खेड-राजगुरुनगर नगरपरिषद आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांचा समावेश करून नविन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार शासनाकडून सुरू होता.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात नदीच्या पलिकडे नविन महापालिका स्थापन करण्याचे सूतोवाच केले होते.
जानेवारी महिन्यात नगरविकास विभागाने विभागीय आयुक्तांना सर्व संबंधित विभागाकडून यासंदर्भातील अहवाल मागविला होता. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीएकडून चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर तसेच नगरपरिषदांच्या हद्दीलगतच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द आदी तपशील घेऊन स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत अभिप्रायासह अहवाल द्यावा. तसेच या अहवालात स्पष्ट अभिप्राय नोंदवावा, अशा सूचना नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.
५० गावांचा समावेश होणार?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासनाने चाकण महापालिका स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. या तिन्ही नगरपरिषदा आणि त्यांच्या आजूबाजूच्या सुमारे ५० गावांचा समावेश त्यामध्ये करावा, अशी शिफारस या अहवालात करून तो विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. विभागीय आयुक्तांकडून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अशी असेल नवीन महापालिका
- चाकण नगरपरिषदेसह २४ गावे
- आळंदी नगरपरिषदेसह १३ गावे
- खेड-राजगुरुनगर नगरपरिषदेसह १३ गावे
- ३०० ते ३५० चौरस किलोमीटरची हद्द
- सुमारे साडेचार लाख लोकसंख्या