
पुणे (Pune) : भूसंपादनामुळे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर (Katraj - Kondhwa Road) वाहतूक सुधारणा करण्याची कामे महापालिकेने (PMC) वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरू केली आहेत. रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण काढणे, साइड पट्ट्यामध्ये डांबरीकरण करून दोन्ही बाजूने रस्ता मोठा करणे, दुभाजक टाकणे ही कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण केली जातील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
५० मीटर रस्त्याचा निर्णय
सोलापूर, मराठवाडा, कर्नाटक, तेलंगण यांसह इतर भागांतून येणाऱ्या अवजड वाहनांना मुंबईला जा-ये करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचा वापर करावा लागतो. हा सुमारे ३.५ किलोमीटरचा रस्ता ८४ मीटर रुंद करण्यात येणार होता. चार वर्षांपूर्वी त्याचे भूमिपूजनही झाले. पण, जागा ताब्यात नसल्याने हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे. ८४ मीटरचा रस्ता करण्यासाठी भूसंपादनासाठीला सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार होता.
तेवढे पैसे महापालिकेकडे नाहीत, त्यामुळे ५० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागामालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २०० कोटी रुपये मिळणार आहेत. पण, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर सुधारणा करण्यासाठी महापालिकेने सुरवात केली आहे. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्यासोबत कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी केली. त्यामध्ये वाहतुकीत बदल करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
काय उपाययोजना करणार...
१) शत्रुंजय मंदिर येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक वळविणे.
२) कात्रज-कोंढवा रस्त्यावर अनेक गल्ल्या मुख्य रस्त्याला जोडल्या गेल्या आहेत. या गल्ल्यांचे पंक्चर बंद करून तेथे दुभाजक टाकणार.
३) गाड्यांना वळसा घेण्यासाठी प्रत्येक २०० मीटरवर सुविधा उपलब्ध करणार. त्यामुळे अवजड वाहनांना अडथळा होणार नाही व वाहतूक सुरळीत राहील.
४) सध्या जो रस्ता आहे तेथे खड्डे पडले आहेत किंवा तो भाग रस्त्याला समपातळीत नाही तो दुरुस्त करणे.
५) रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्यांवर डांबरीकरण करून रस्ता मोठा करणे.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि वाहतूक सुधारण्यासाठी वाहतूक पोलिस आयुक्तांसोबत संयुक्त पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी रस्त्यावर दुभाजक टाकून पंक्चर बंद करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार पुढील १५ दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल. तसेच, दोन्ही बाजूने रस्ता मोठा करण्यासाठी साइड पट्ट्यांवर डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
कात्रज-कोंढवा रस्ता अनेक दिवसांपासून रखडला आहे. मात्र, आता महापालिकेकडून ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता करणे, साइड पट्टे मारणे, दुभाजक टाकण्याचे काम सुरु केले आहे. याचा फायदा होईलच; मात्र, उर्वरित जागा ताब्यात घेऊन संपूर्ण रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे.
- श्याम मरळ, स्थानिक नागरिक
गेल्या चार वर्षांपासून कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे. महापालिकेला या कामासंदर्भात उशिरा जाग आल्याचे यातून दिसून येते. परंतु, उशिरा का होईना काम जलदगतीने करून ते पूर्णत्वास न्यावे, ही अपेक्षा आहे.
- अमोल लोहार, स्थानिक नागरिक