Pune : धडाकेबाज निर्णय अन् हवी प्रभावी अंमलबजावणी; वाघोलीतील कोंडी कधी फुटणार?
पुणे (Pune) : पुणे नगर महामार्गावर प्रचंड वाढलेल्या वाहन संख्येने वाघोलीत वाहतूक कोंडी निर्माण होते. ही कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए व महावितरण यांच्या संयुक्त निर्णय व अंमलबजावणीची गरज आहे. (Pune Traffic Update)
वाहतूक उपायुक्तांकडून पाहणी केली जाते, समस्या जाणून घेतल्या जातात, मात्र त्यावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त बैठक घेवून निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे वाघोलीतील वाहतूक कोंडी कायम आहे.
पुणे पोलिसांनी अधिक मनुष्यबळ, वॉर्डन, टोईंग व्हॅन, जामर यासारख्या यंत्रणा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र ते ही मिळत नाही. इतर विभाग तर एकमेकाकडे बोट दाखविण्याचे काम करतात. वाहतूक अडथळा ठरणारे अतिक्रमणे, विद्युत पोल हटविण्याचीही गरज आहे.
वाघोलीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी नुकतीच पाहणी केली. मात्र केवळ पाहणी करून काय साध्य होणार. प्रत्यक्षात उपाययोजना होणे गरजेचे आहे, असा सूर नागरिकांमधून निघत आहे.
या पूर्वी तत्कालीन उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दोन महिन्यापूर्वी, तर विजय मगर यांनीही काही महिन्यांपूर्वी पाहणी केली होती.
महामार्गावरील पाणी जाण्यासाठी पावसाळी वाहिनी योजना नसल्याने पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. वाहतूक नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई हा ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीची उपाययोजना आहे. स्कूल बसेस, कंपनी बसेस एका वेळी महामार्गावर येणार नाहीत असे नियोजन करण्याची गरज आहे. अनाधिकृत असलेले फ्लेक्स रस्त्यावर पडून वाहतुकीला अडथळा होतो. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पुणे नगर रोड वर होर्डिंग पडून चार तास वाहतूक ठप्प झाल्याचा प्रकारही घडला.
डीपी रस्ते विकसित केल्यास त्यातूनही वाहतूक कोंडी कमी होईल. वाघोलीतील वाहतूक कोंडीचा फटका अनुभवणारे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही वाहतूक कोंडीचे गांभीर्य लक्षात आले आहे. यामुळे त्यांच्या स्तरावर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून तात्काळ निर्णायक अंमलबजावणी केल्यास त्याचा फायदा वाघोलीकरांना आणि पुणे नगर महामार्गाने प्रवास करणाऱ्यांना होऊ शकतो.
केवळ वाहतूक विभागाने पाहणी करून कोंडी कमी होणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाहणी वेळी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक राजकुमार शेरे, लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव उपस्थित होते.
वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने पाहणी केली आहे. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून यावर काय उपाययोजना करणे शक्य आहे त्याचा आढावा घेण्यात येईल. अन्य विभागाची गरज भासल्यास पुणे पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत इतर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून निर्णय घ्यावा लागेल.
- रोहिदास पवार, उपायुक्त, पुणे वाहतूक विभाग.