
पुणे (Pune) : शिवाजीनगर ते हिंजवडी (Shivajinagar To Hinjavadi Metro Line) या मार्गावरील मेट्रोसाठी आवश्यक कामगार भरतीची जाहिरात बिहारमधील (Bihar) वृत्तपत्रांमध्ये देत भूमीपुत्रांना रोजगारापासून वंचित ठेवत असल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मेट्रो प्रशासन व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन केले.
मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याची मागणी मेट्रो, पीएमआरडीए प्रशासनाकडे केली.
मंगळवारी दुपारी मनसेच्या वतीने औंध येथील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मेट्रो व पीएमआरडीए प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, नेते राजेंद्र वागसरकर, विभागाध्यक्ष विनायक कोतकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. आंदोलनानंतर मनसेच्यावतीने अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बाबर म्हणाले, महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या विरोधी भूमिकेचा मनसे निषेध करीत आहे. या भरतीची जाहिरात मराठी वृत्तपत्रात दिलेली नाही. बिहारमधील नोकरभरती तातडीने थांबवावी, पुणे मेट्रो भरतीमध्ये महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. मराठी वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत जाहिराती प्रसिद्ध करा. तसे न केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.