PMC : पाणी तुंबल्याने कोट्यवधींचे नुकसान; महापालिका प्रशासनाला जाग कधी येणार?
पुणे (Pune) : नाल्यात टाकला जाणारा कचरा, लाकडाचे ओंडके, फर्निचरमुळे प्रवाहाला निर्माण झालेला अडथळा, कलव्हर्टमध्ये असलेला राडारोडा, नाल्यात झालेली अनधिकृत बांधकामे आणि त्याला मिळणारे अभय यामुळे नागझरी नाल्याची स्थिती भीषण झालेली आहे.
पाच वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली होती. अशा भयंकर संकटाची भीती नागझरी नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे डोळे उघडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुसळधार पावसामुळे नागझरी नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे कासेवाडी, लोहियानगर येथील घरांमध्ये पाणी घुसले. टिंबर मार्केटमध्ये पाणी तुंबून व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कासेवाडी येथे महापालिका वसाहत क्रमांक १० च्या मागे नाल्यावर स्लॅब टाकून नाला बंदिस्त केला आहे. त्यावर अनधिकृतपणे भंगाराची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. ही जागा महापालिकेची असली तरी त्यातून स्थानिक पुढाऱ्यांचे उत्पन्न सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले.
नाल्याचा हा भाग बंदिस्त केल्याने त्याच्या आतमध्ये जाऊन महापालिकेची यंत्रणा स्वच्छता करू शकत नसल्याने व नाल्यापेक्षा कलव्हर्ट लहान झाल्याने पाणी तुंबत आहे. त्याचा फटका महापालिका वसाहतीतील रहिवाशांना बसत आहे. याच ठिकाणी नाल्यांमध्ये खांब टाकून अधिकृत बांधकाम केले आहे. त्याकडेही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
टिंबर मार्केट, नेहरू रस्ता परिसरात अनेकांनी भर रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केले आहेत. हे व्यापारी त्यांच्याकडील लाकूड, फर्निचर थेट नाल्यांमध्ये ठेवून त्याचा वापर गोडावूनप्रमाणे करत आहेत. नाल्यामध्ये लाकडाचा भुसा, थर्माकोल, लाकडे टाकली जात असल्याने प्रवासाला अडथळा निर्माण होत आहे.
आता पाणी तुंबल्यानंतर महापालिकेने तेथे कारवाई करून नाला मोकळा केला असला तरी त्यासाठी पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी वारंवार कारवाई करणे आवश्यक आहे.
महापालिका नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. सर्व कलव्हर्ट स्वच्छ केले आहेत, असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात नागझरी नाल्यावरील कलव्हर्ट स्वच्छ केले जात नाहीत, असेच निदर्शनास आले आहे. कव्हर्टच्या मध्यभागातून पाणी वाहते, पण कडेच्या दोन्ही गाळ्यात माती, दगड, कचरा साचलेला आहे.
ठेकेदाराकडून हा कचरा काढला जात नाही. त्यामुळे नाल्याला पूर आल्यानंतर कासेवाडी, लोहियानगर, अल्पना टॉकीज, किराड वस्ती, घसेटी पूल भागात त्याचा फुगवटा निर्माण होतो. या पाण्यात थर्माकोल, लाकूड वाहून आल्याने स्थिती गंभीर बनत आहे.
लोहियानगरमध्ये म्हसोबा मंदिराजवळून नाला वाहतो. त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम झाले आहे. येथील कलव्हर्टमध्ये राडारोडा अडकला असून, तो काढला जात नाही. महापालिकेने सुमारे २० वर्षांपूर्वी येथील नाल्यात सांडपाणी वाहिनी टाकली आहेत. आता त्यावरच अनधिकृत बांधकामे झाली आहेत. एका ठिकाणी नाला २०-३० फूट रुंद असताना या अतिक्रमणांमुळे तो अवघा १०-१५ फूट शिल्लक आहे. भर नाल्यात पत्र्याचे शेड टाकून, तर काहींनी विटांचे बांधकाम करून पक्की घरे बांधली आहेत.
लोहियानगर, कासेवाडी, टिंबर मार्केटसह अन्य भागात राजकीय हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवसाय सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरून व्यवसाय करणारे व्यापारी, स्थानिक रहिवासी यामुळे त्रस्त झाले आहेत. तसेच याविरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक गुंडांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे, असे काही नागरिकांनी सांगितले.
आम्ही गेल्या ५० वर्षांपासून इथे राहात आहोत, नागझरी नाल्याला अचानक पूर येतो. आमची लेकरे इथेच खेळत असतात. सुरक्षेसाठी भिंत बांधावी, नाल्याचे पाणी बाहेर येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे कोणालाच वाटत नाही. रविवारी दिवसा पाऊस आला म्हणून बरे झाले, रात्री पाणी घरात घुसले असते तर काय केले असते? आमच्याकडे कोणाचे लक्ष नाही, पुढारी फक्त निवडणुकीत मत मागायला येतात.
- शालन जाधव, लोहियानगर