पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) पुन्हा एकदा सहाय्यक प्राध्यापकांच्या कंत्राटी भरतीची जाहिरात काढली आहे. त्यानुसार विविध विभागांत १३३ सहाय्यक प्राध्यापकांची भरती येत्या काळात करण्यात येणार आहे.
मंत्र्यांनी अनेकदा आश्वासनांची खैरात केली, अनेकांनी कागदी घोडे नाचविले, मात्र वास्तवात अजूनही विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती झाली नाही.
शासनाकडून पदभरती रखडल्याने विद्यापीठाला कंत्राटी प्राध्यापकांवर अवलंबून राहावे लागत असल्याची स्थिती आहे. विद्यापीठाला आपल्या फंडातून त्याचा खर्च भागवावा लागत असल्याने आर्थिक बोजा पडत आहे. पूर्णवेळ प्राध्यापक नसल्याने अध्यापनासह संशोधनाच्या कामांवरही परिणाम होत आहे.
विद्यापीठातील विविध विषयांसाठी १३३ सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५१ पदे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी भरली जाणार आहेत. त्याखालोखाल आंतरविद्याशाखीय विद्याशाखेसाठी ३८, मानव्यविज्ञानसाठी ३४ आणि वाणिज्य व व्यवस्थापनविद्याशाखे सहा प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. तर स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी चार सहाय्यक प्राध्यापकांना घेणार आहेत. या प्राध्यापकांचा कालावधी ३१ मे २०२४ पर्यंत असणार आहे.
कंत्राटी भरतीची प्रक्रिया
अर्ज करण्याची अंतिम मुदत गुरुवार (ता. २०) पर्यंत आहे. त्यानंतर मुलाखतींद्वारे निवड केली जाणार आहे. या पदासाठी विद्यापीठाकडून ४० हजार रुपये वेतन दिले जाईल. पदव्युत्तर पदवीमध्ये किमान ५५ टक्के गुण आणि सेट, नेट किंवा पीएचडी पदवी असलेले उमेदवार पात्र ठरतील. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे इतर सवलतीही लागू असणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी https://admin.unipune.ac.in/recruitment/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विद्याशाखानिहाय पदसंख्या
विज्ञान व तंत्रज्ञान : ५१
आंतरविद्याशाखीय अभ्यास : ३८
मानव्यविज्ञान : ३४
वाणिज्य व व्यवस्थापन : ६
स्पर्धा परीक्षा केंद्र : ४