
पुणे (Pune): माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन 3 (Pune Metro Line 3) या प्रकल्पाची पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) शुक्रवारी घेतलेली चाचणी यशस्वी झाली.
चार स्थानकांपर्यंक चाचणी
माण डेपो ते पीएमआर अशा चार स्थानकापर्यंत ही चाचणी झाली. या प्रकल्पाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
पीएमआरडीएने टाटा आणि सिमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरवात झाली. या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे.
गाडीचा वेग ताशी ८० किमी
एकूण २३.३ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गावर २३ स्थानके आहेत. महामेट्रोने हाती घेतलेल्या मेट्रो मार्गांसह ही मेट्रो एकसंध असणार आहे. त्यामुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा संच आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डबे आहेत. त्याची एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी ८० किलोमीटर वेगाने धावणार आहे.
पहिली चाचणी यशस्वी
मेट्रोची माण डेपो ते पीएमआर दरम्यानच्या चार स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोचली आहे. या मेट्रो लाईन ३ चे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असून पुणे शहरासह संबंधित मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
कोंडी कमी होण्याची अपेक्षा
पुणे शहरातून दररोज हिंजवडी येथील आयटी पार्क जाणाऱ्या नागरिकांची सुमारे एक लाखाहून अधिक संख्या आहे. त्यामुळे हा मेट्रो प्रकल्प पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर औंध, पाषाण, बाणेर यांच्यासह सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.