.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे (Pune): बोरघाटात जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र.४८) हा बोरघाटातून जात असून हा मार्ग तीव्र चढ-उताराचा तसेच धोकादायक वळणाचा आहे. घाटातून जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे गंभीर अपघात आतापर्यंत घडले आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना टोल भरावा लागतो. यामुळे वाहनचालक सोयीचा मार्ग म्हणून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटाचा वापर करतात.
यावर खोपोलीचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी रायगडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडेही मागणी केली होती.
लोणावळा-खंडाळ्यातूनही बंदी कायम
वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर लोणावळा-खंडाळ्यातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना पूर्वीपासूनच बंदी आहे. मात्र, काही वाहनचालक दुर्लक्ष करत शहरातून जातात. वाहतूक पोलिस दंड आकारतात. पण, अवजड वाहने शहरातून प्रवेश करणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.