ना टेंडर, ना वर्क ऑर्डर; सातारकरांना नवीन इमारतीचे गाजर

Satara

Satara

Tendernama

सातारा (Satara) : ऐनवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मागे पाऊल घेतलेल्या सातारा पालिकेच्या नविन इमारतीच्या भूमिपूजनाचा समारंभ आता दुसऱ्यांदा थाटात पार पडला. परंतु, ना टेंडर, ना वर्क ऑर्डर निघता झालेल्या या भूमीपूजनाने सातारकरांना निवडणुकांच्या तोंडावर नवीन पालिका इमारतीचे गाजर दिले गेल्याची चर्चा साताऱ्यात चांगलीच रंगली आहे.

विसावा नाका परिसरातील जागेवर सातारा पालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम नुकताच थाटात पार पडला. वास्तविक गेल्या अनेक वर्षापासून नवीन इमारतीच्या जागेचा प्रश्न साताऱ्यात गाजत होता. आता भूमिपूजनाचा मुद्दा गाजू लागला आहे. पालिकेच्या मागील पंचवर्षिक निवडणुकीच्या तोंडावर नवीन इमारतीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. राज्यात भाजपचे सरकार होते. फडणवीस साताऱ्यातील राजेंना जाळ्यात आणण्यासाठी गळ टाकून होते. त्यामुळे राजेंचा शब्द खाली पडून दिला जात नव्हता. या संधीचे सोने करून घेण्यासाठी सातारा पाकिलेच्या नविन इमारतीच्या प्रस्तावाला जोर आला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच त्याच्या उद्घाटनचा घाट घालण्यात आला होता; परंतु, जागेचे प्रकरण अद्याप मार्गी लागले नसल्याची बातमी फडणवीसांपर्यंत पोहचवली गेली. त्यामुळे साताऱ्यातील भरगच्च उदघाटनांच्या कार्यक्रमातून हा नवीन इमारतीचा प्रोग्रॅम ऐनवेळी वगळला गेला. तेंव्हा एकदा स्थानिक पातळीवर हा प्रोग्रॅम उरकण्यात आला.

विधानसभा निवडणुकीनंतर साताऱ्यातील लोकप्रतिनिधींचे सगळेच फासे उलटे पडले. लोकसभेत पराभव झाल्याने उदयनराजेंना राज्यसभेवर जावे लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातील संभाव्य मंत्रीपद दूर गेले. तर, भाजपचे सर्वाधिक आमदार येऊनही मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांना विरोधी बाकावर समाधान मानावे लागले.

राज्यातील सत्ताकारणाच्या या बदलामुळे सातारा पालिकेतील संभाव्य विकास कामांची स्वप्नेही लांबली. गेली पाच वर्षे नूतन इमारतीच्या भूमिपूजनाला काही मुहूर्त लागला नाही. पालिकेच्या सत्तेची पाच वर्षे सरताना सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या वचनाची आठवण झाली. त्यातून पाकिलेच्या नवीन इमारतीच्या जागेवर पुन्हा थाटात मांडव सजवला गेला. या सभेतील खासदार उदयनराजेंची भावूकता राज्यात चर्चेचा विषय बनली. याच कार्यक्रमाच्या भाषणात त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना चर्चेचे खुले आव्हान दिले; परंतु या कार्यक्रमानंतर साताऱ्यात दुसरीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे ना टेंडर, ना वर्क ऑर्डर सातारकरांना दिले नवीन इमारतीचे गाजर. एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला जाहिरात पाहिजे म्हणून माध्यम प्रतिनिधींनी जाहिरातीसाठी पालिका प्रशासनाला साकडे घातले. परंतु, त्यांनीही हेच कारण देत हा राजकिय कार्यक्रम असल्याचे सांगत खरे काय तुम्हीच शोधा असे सूचकरित्या सांगून टाकले. त्यामुळे या कार्यक्रमानंतर विरोधकांनी हाच मुद्दा रेटत व्हॉट्सऍप चॅट रंगवले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com