
मुंबई (Mumbai): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (SPPU) विविध प्रमाणपत्र आणि श्रेयांक पत्रकांचा कागद आता नाशिकच्या भारत प्रतिभूति मुद्रणालय अर्थात इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून छापला जाणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा निर्णय असून प्रमाणपत्रांच्या छपाईत सिक्युरिटी प्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण झाल्याने विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे आता अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असणार आहे.
इंडियन सिक्युरिटी प्रेस ही देशातच नाही जगात सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या प्रेस पैकी एक आहे. भारतासह अनेक देशातील पासपोर्ट, १० रुयांपासून ५० हजारापर्यंतचे मुद्रांक, महसूल विभागाचे मुद्रांक, इलेक्शन सील, लिकर सील, लष्करी आस्थापनांची ओळखपत्रे, देशातील अनेक विद्यापीठे केंद्रीय विद्यालयाचे गुणपत्रके आदींची छपाईची कामे नाशिकच्या या सिक्युरिटी प्रेसमध्ये होतात.
विद्यापीठाच्या प्रमाणपत्राची छपाई पारदर्शक, सुरक्षित, गोपनीय पद्धतीने कशी करावी यासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे, परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. संदेश जाडकर, डॉ. विजय खरे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. संजय तांबट, डॉ. चारुशीला गायखे आदींच्या समितीने सदर खरेदी प्रक्रिया राबवली.
नुकताच या समितीने इंडियन सिक्युरिटी प्रेसची पाहणी करून अधियाकाऱ्यांशी चर्चा केली. देशातील ३ प्रेसने दाखल केलेली खरेदी प्रक्रिया राबविली. त्यानुसार इंडियन सिक्युरिटी प्रेसला काम देण्याबाबत अहवाल दिला. पूर्वी ६ असलेली सुरक्षा माणके आता १६ होणार आहे. सिक्युरिटी प्रेसची सुरक्षा माणके, कागदाचा नमुना, प्रेसची गोपनीयता आणि विश्वसार्हता आदींमुळे यापुढे प्रो प्रिंटेड स्टेशनरीची खरेदी यापुढे इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून करण्यात यावी यास विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिल आणि खरेदी समितीनेही तत्काळ मंजुरी दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सारख्या मान्यताप्राप्त विद्यापीठाचे प्रमाणपत्रही इंडियन सिक्युरिटी प्रेस इथे छापली जावी अशी ईच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. बाहेरच्या खाजगी प्रेसला दिल्या जाणाऱ्या निविदेत केवळ ६ सुरक्षा मानके होती. दरही काही पट अधिक होते. त्यामुळे पुणे विद्यापीठावर प्रमाणपत्र कागद खरेदीतील भ्रषाचाराचीही आरोप, चर्चा होत. यावर उपाय म्हणून नाशिकच्या शासकीय इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये छपाई व्हावी अशी मागणी मी २ वर्षापूर्वी मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये केली होती. झालेला निर्णय विद्यापीठाच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. यामुळे विद्यापीठाचे कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून प्रमाणपत्रेही अति सुरक्षित होणार आहेत.
- सागर वैद्य, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर, एसपीपीयू