
सोलापूर (Solapur) : सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार बेघर लाभार्थीना १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता महिन्यापूर्वी मिळाला. पण बांधकाम साहित्य महागले, मोफत वाळू मिळत नसल्याने सुमारे १० हजार लाभार्थीना बांधकामेच सुरू केलेली नाहीत. (Solapur ZP, PM Awas Yojana)
दुसरीकडे जिल्ह्यातील नऊ हजार ७०० लाभार्थीना स्वप्नातील घर बांधकामासाठी स्वतःची जागा नाही. त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल मंजूर झालेल्यांना लगेचच १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. बांधकाम सुरू होऊन पाया पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता तर लिंटल लेव्हलपर्यंत बांधकाम झाल्यावर तिसरा आणि काम पूर्ण झाल्यावर शेवटचा चौथा हप्ता मिळतो. दरम्यान, जिल्हा दरसुचीनुसार (डीएसआर) २६९ चौरस फूट घरकुल बांधकामासाठी दोन लाख २५ हजार रुपयांपर्यंत आहे.
पण, सध्या घरकुलासाठी सरकारकडून अवघे एक लाख २० हजार रुपयेच मिळतात. हे अनुदान दोन लाख रुपये करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वीच जाहीर केले. पण त्यासंदर्भातील शासन आदेश अजूनही निघालेला नाही.
दुसरीकडे गायरान जमिनी सोडून महाराष्ट्र शासनाच्या जागा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या जागा बेघर कुटुंबांना घरकूल बांधकामासाठी देण्याचे नियोजन आहे. पण, त्यावरही अंतिम निर्णय झालेला नाही.
जिल्ह्यातील उचेठाण व माचणूर या दोन वाळू ठेक्यांना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यास तेथील वाळू घरकूल लाभार्थीना मोफत मिळू शकते.
शासनाचे वाळू धोरण अजूनही निश्चित नसल्याने जिल्ह्यातील खानापूर, कुडल, देवीकवठे (ता. अक्कलकोट), मिरी- ताडोर (मोहोळ-मंगळवेढा), बाळगी, भंडारकवठे, लवंगी (ता. दक्षिण सोलापूर), माळेगाव, आलेगाव बु., टाकळे टें., गारअकोले (माढा), आव्हे, नांदोरे (ता. पंढरपूर) अशा ११ ठेक्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत.
या ११ ठिकाणी दोन लाख ब्रासहून अधिक वाळू आहे. वाळूचे लिलाव बंद असल्याने अनेक लाभार्थीनी घराचे बांधकाम सुरू केलेली नाहीत, अशीही स्थिती आहे.