Solapur News सोलापूर : सोलापुकरांसाठी अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली होटगी रोड विमानतळावरील विमानसेवा सुरू होण्यासाठी आता एक एक टप्पा पूर्ण होत आहे. या विमानतळाच्या धावपट्टीचे, संरक्षक भिंतींचे व प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
ही सर्व कामे १० जुलैपर्यंत पूर्ण होतील. तत्पूर्वी विमानसेवेसाठी आवश्यक असलेला परवाना मिळविण्यासाठी १५ जूनच्या आसपास नागरी विमान वाहतूक महासंचलनालय (डीजीसीए) यांच्याकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, विमानसेवेच्या परवान्यासाठी सोलापुरातून प्रस्ताव गेल्यानंतर डीजीसीएचे पथक होटगी रोड विमानतळावर येऊन विमानतळाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. या पाहणीत त्यांना ज्या काही त्रुटी आढळतील, त्या त्रुटी दुरुस्त करण्याची सूचना केली जाईल.
या त्रुटींची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एकदा अंतिम पाहणी व विमानसेवेसाठी आवश्यक असलेला परवाना दिला जाईल. त्रुटीची दुरुस्ती व अंतिम पाहणी यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असते. सोलापूरकरांची विमानसेवेची गरज पाहता हा कालावधी कमी करावा, लवकरात लवकर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.
विमानतळाची तक्रार, कारखान्याने केले अतिक्रमण
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या होटगी रोड विमानतळाने उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार केली आहे. विमानतळाशेजारी असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने विमानतळाच्या जवळपास दीड एकारावर अतिक्रमण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
विमानतळाच्या या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी पडदुणे यांनी या प्रकरणात सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली असून या प्रकरणाची पहिली सुनावणी सोमवारी (ता. २७) होणार आहे. विमानतळाच्या तक्रारीचाही जून-जुलैच्या आसपास निकाल अपेक्षित आहे.
विमानसेवेच्या परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर डीजीसीएच्या पथकाकडून विमानतळाची पाहणी केली जाईल. या पाहणीनंतर त्रुटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सोलापूरकरांसाठी हा कालावधी कमी करून मिळावा यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी