सातारा (Satara) : सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara ZP) विविध विभागांच्या माध्यमातून मंजूर विकासकामे दर्जेदार होण्यासाठी खातेप्रमुखांनी लक्ष द्यावे. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहू नये, यासाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी खातेप्रमुखांना दिल्या. या सभेत विषयपत्रिकेवरील दहा व ऐनवेळच्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक संतोष हराळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, अर्चना वाघमळे, क्रांती बोराटे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, मोहसीन मोदी, गौरव चक्के, अरुणकुमार दिलपाक, कृषी विकास अधिकारी विजय माईणकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीसह विविध माध्यमातून मंजूर असलेल्या कामांची टेंडर प्रक्रिया गतीने राबवून उपलब्ध निधी मुदतीत खर्च करा. विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी खातेप्रमुखांनी लक्ष द्यावे. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहू नये, यासाठी सर्व विभागांनी आत्तापासूनच नियोजन करावे.
जिल्हा परिषदेचा कारभार आणखी गतिमान करण्यासाठी सर्वांनी लक्ष देऊन प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा करावा, अशा सूचना खिलारी यांनी केल्या. या वेळी खातेप्रमुखांनी विभागनिहाय आढावा सादर केला. नीलेश घुले यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.