Nitin Gadkari: जेजुरीत नवा उड्डाणपूल! फलटण, नीरा रोड, पंढरपुरात बायपास

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

मुंबई (Mumbai): केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (14 मे) पुणे-हडपसर-दिवे घाट-सासवड-जेजुरी-फलटण-नातेपुते-वेळापूर मार्गे पंढरपूरपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाची पाहणी केली आणि विकासकामाचा आढावा घेतला. लाखो वारकऱ्यांची ‘वारी’ सुखकर व आल्हाददायक व्हावी, या उद्देशाने ही विकासकामे करण्यात येत आहेत.

Nitin Gadkari
नाशिकमध्ये 'जलयुक्त शिवार'ला खीळ! भाजप आमदाराच्या 'हट्टामुळे' 11 कामांचे पुन्हा फेरटेंडर

यासोबतच केंद्रीय मंत्र्यांकडून जेजुरी येथे नवीन उड्डाणपुल, फलटण येथे वन-टाईम इम्प्रूव्हमेंट, नीरा रोड येथे आरओबी, पंढरपूर बायपास तसेच दोन्ही पालखी मार्ग एकत्र येतात, त्या तोंडले याठिकाणी विविध विकास प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. 

संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती देताना गडकरी म्हणाले, “एकूण सहा पॅकेजेसमध्ये सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून सदर मार्गावर काही नवीन विशेष प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जेजुरी येथे 250 कोटी रुपये तरतुदीसह 2 किमी लांबीचा जेजुरी उड्डाणपुल बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल व शहरातील अपघाताचे प्रमाण कमी होईल.

फलटण शहरात वन टाईम इम्प्रूव्हमेंट तत्त्वावर 97 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. फलटण शहरातील अरुंद रस्त्याचे व राव रामोसे पुलाचे रुंदीकरण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. तसेच रुंद रस्त्यावरून पालखीच्या वेळेस वारकऱ्यांना मार्गक्रमण सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. 

Nitin Gadkari
कोपरगाव-मालेगाव मार्गावर येवल्यात उड्डाणपूल नको; बायपास करा

याशिवाय नीरा रोडवर 72 मी. (Single Span) आरओबीची घोषणा करण्यात आली. या ROB मुळे खंडित रस्ता जोडला जाईल व सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका  होईल. तसेच टेंभूर्णी-पंढरपूर (राष्ट्रीय महामार्ग-561ए) मध्ये 9.50 किमीच्या पंढरपूर बायपासची घोषणा करण्यात आली. 9.50 किमीच्या या बायपासमुळे (टेंभुर्णी-पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित) शिर्डी-अहिल्यानगर-टेंभुर्णी कडून येणारी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर-मंगळवेढा मार्गे शहराबाहेरून जाईल व अपघाताचे प्रमाण कमी होईल.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड उपलब्ध होईल, ज्यामुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. दोन्ही पालखी मार्ग एकमेकांना मिळतात त्या तोंडले याठिकाणी 100 कोटी रुपयांच्या तरतुदीसह उड्डाणपुलाचीही घोषणा करण्यात आली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-965) हा आळंदी ते पंढरपूर आणि पुढे मोहोळ ते वाखरी असा सुमारे 234 किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, जो पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. 7,625 कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येत असलेल्या या मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपूरी, धर्मपूरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट आणि दिवे घाट ते हडपसर अशा 6 पॅकेजमध्ये करण्यात येत आहे.

यापैकी 4 पॅकेजचे काम पूर्ण झाले असून धर्मपूरी ते लोणंद काम अंतिम टप्प्यात आहे, तर दिवे घाट ते हडपसर या पॅकेजचे 65% काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या भागांना बायपास करत जलद आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतो. 

Nitin Gadkari
Pune Nashik Highway Traffic: पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी का फुटेना? काय आहेत कारणे?

या मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदयात्रा मार्ग उभारण्यात आला असून, यामुळे वारकऱ्यांची वारी आता अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित झाली आहे. विशेषत: दिवे घाट विभाग-2 वरून 4-लेनमध्ये रूंद आणि मजबूत करण्यात येत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल. यासोबतच उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास आणि आधुनिक पुलांच्या माध्यमातून हा मार्ग अधिक सक्षम करण्यात आला आहे.

पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर याठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. 

ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या हेतूने माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेली ऐतिहासिक विहीर, वेळापूर येथील पुरातन लेणी व वाखरी जवळील बाजीराव विहीर या ऐतिहासिक स्थळांचे जतन करून प्रगती व संस्कृतीची सांगड घालण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम करताना सोलापूर व सातारा जिल्ह्यांत बुलढाणा पॅटर्नच्या धर्तीवर जवळपास 43 तलावांचे खोलीकरण करून तेथील मुरुम, माती महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आली आहे. यामुळे अतिरिक्त जलसंचय झाला असून तेथील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Tendernama
www.tendernama.com