
कऱ्हाड (Karad) : तीन वर्षांपासून शहरातील पालिकेच्या शहरातील पालिकेच्या गाळ्यांचा काहीच निर्णय झालेला नाही. त्या गाळ्यांच्या भाडेनिश्चितीचा प्रस्ताव नगररचना विभागात तीन वर्षांपासून धूळखात पडला आहे. तो निर्णय होत नसल्याने पालिकेच्या भाडे आकारणीत अडचणी येत आहेत. पालिकेच्या कराराची मुदत संपलेल्या ५०० हून अधिक जुन्या गाळ्यांचा फेरलिलावाचा निर्णय प्रलंबित राहिला आहे.
निर्णयाअभावी पालिकेचे उत्पन्न बुडाले
शहरात ५५० गाळ्यांची मुदत संपली आहे. गाळे फेरलिलावात सामील केले आहेत. पालिकेने गाळ्यांचे भाडे दुप्पट केले होते. त्यातून पालिकेच्या उत्पन्नात तब्बल दोन कोटीने वाढ झाली. पालिकेने मध्यंतरी सर्व्हे केला. त्यानुसार मार्च २०२१ पर्यंत पालिकेला गाळ्यांच्या भाड्यातून दोन कोटी ५० लाखांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात केवळ एक कोटी २६ लाखांचा महसूल जमा झाला.
त्यात पालिकेने जनरल गाळ्यातून ५१ लाख ७६ हजार, आययुडीपीतील गाळ्यांतून ३२ लाख ८० हजार, आययुडीपी योजनेतील गाळ्यांतून २८ लाख ५८ हजार, तर युडी सहा योजनेतील गाळ्यातून १३ लाख ७९ हजारांचा महसूल मिळाला. दोन कोटी ५० लाखांपैकी सव्वा कोटींचा थकीत होता. त्या वेळी दुप्पट भाडेवाढीनुसार सध्या तरी पालिकेला दोन कोटींचे उत्पन्न नव्याने मिळाले.
अनेक वर्षांपासून नवा करारच नाही
शहरात ७०४ गाळ्यांपैकी जनरल योजनेतून २०८, आययुडीपीनेतून २३० तर युडी सहा योजनेतून २६८ गाळे बांधले आहेत. पालिकेचे तब्बल ६९८ गाळे आहेत. चार हॉल तर दोन इमारती आहे. पालिकेने मुदत संपलेल्या ५५० गाळ्यांचा सर्व्हे पालिकेने केला. त्यामुळे त्या गाळ्यांवर फेरलिलावाची कुऱ्हाड कोसळणार होती. मात्र, नगररचनाकडे त्याच्या भाडेनिश्चितीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो वर्षभरापासून धूळखात पडला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत निर्णय घेताना पालिकेला कसरत करावी लागत आहे.
गाळ्यांचे अनेक वर्षांपासून करार न झाल्याने त्या गाळ्यांची माहिती घेऊन त्यांची मुदत संपल्याने त्या गाळ्यांचे पालिका फेरलिलाव करून त्यातून नव्याने पालिकेला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणार आहे. मात्र, नगररचना विभागाच्या आडमुठेपणामुळे तो प्रयत्न फसल्याचे दिसते. त्यावर ठोस उपायांची गरज आहे.
असे आहेत गाळे
शनिवार पेठ - ३६३ गाळे व चार हॉल
गुरुवार पेठ - २९६ गाळे
बुधवार पेठ - २० गाळे
सोमवार पेठ - १६ गाळे व एक इमारत
मंगळवार पेठ - तीन गाळे
रविवार पेठ - एक इमारत