वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका; पालिका अन् पोलिसांचे दुर्लक्ष
सातारा (Satara) : मलकापूर येथील परिसरात अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. मात्र, त्या उभारताना त्यासाठी आणलेले बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच टाकले जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याकडे पालिका तसेच पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे.
काही ठिकाणी जुन्या इमारतींचे मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी आणलेले साहित्यास संबंधित ठिकाणी जागा नसल्याने अनेक जण ते साहित्य रस्त्यावरच ठेवतात. मात्र, ते साहित्य वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
ठिकठिकाणी विटा, सळई, खडी यासह इतर साहित्य टाकलेले दिसून येते. त्यामुळे इमारतीचे बांधकाम करणारे ठेकेदार तसेच मिळकतदारांना पालिकेकडून सूचना देण्याची गरज आहे.
जुन्या पूल मार्गावर वाहनचालकांची मनमानी
कऱ्हाड : येथील जुन्या कोयना पुलानजीक शहरातून वारुंजी फाट्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांकडून मनमानीपणा केला जात आहे. पोलिसांनी वाहतूक सुरळीत राहावी, अपघाताचा धोका कमी व्हावा, यासाठी बीएसएनएल कार्यालयासमोर बॅरिगेटस लावले आहेत. त्यामुळे पुलावरून कऱ्हाड शहरात येणारे व कऱ्हाडमधून वारुंजी फाट्याकडे जाणाऱ्या वाहनांना दोन स्वतंत्र मार्ग उपलब्ध केले आहेत.
तरीही शहरांमधून जाणारे दुचाकी चालक परिस्थितीकडे दुर्लक्ष करत थेट वारुंजी फाट्याकडून कऱ्हाडमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी केलेल्या मार्गिकेत येतात. त्यामुळे अनेकदा वाहने समोरासमोर येऊन वाद होत आहेत. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची गरज आहे.

