मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai - Goa Highway) नीट न होण्याचे मूळ कारण हे येथील स्वस्त जमिनीत आहे. जेव्हा हा रस्ता होईल तेव्हा शंभरपट किंमतीने या जमिनी व्यापाऱ्यांना विक्री होणार आहेत. त्यामुळे कोणीही जमिनी विकू नका, आपल्याकडे कुंपनच शेत खात आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग आहे. सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन आहे. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेल्या माणसाचे आयुष्य परत येत नाही, असे टीकास्त्र सुद्धा राज ठाकरे यांनी सरकारवर डागले. मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्थेबाबत रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे राज ठाकरे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, गेल्या 15 वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळे अडीच हजार जणांचा मृत्यू झाला. 17 वर्षांपासून हा रस्ता का होत नाही, याचे उत्तर म्हणजे तुम्हाला राग येत नाही. जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. जागरुक राहा असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी कोकणी बांधवांना केले. सरकार कोणतेही असो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नसते असा इशारा सुद्धा राज ठाकरे यांनी दिला.
1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, मुंबई-पुणे रस्ता दोन तासांत पार करता येईल, असा तयार करायचा आहे. ज्या महाराष्ट्राने प्रत्येक वेळी देशाचे प्रबोधन केले, देशाला दिशा दिली. मुंबई-एक्सप्रेस झाल्यावर देशाला कळाले की, अशा प्रकारचा रस्ता बांधला जाऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाला. या रस्त्यानंतर चांगले रस्ते होऊ लागले. मुंबई-पुणे रस्ता हा देशाला दिशादर्शक रस्ता आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला आदर्श घालून दिला, त्या महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्त्याची अवस्था काय अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
मुंबई-गोवा महामार्गावर नीट न करण्याचे मूळ कारण म्हणजे अत्यंत कमी किंमतीत कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेता येतात. ज्यावेळी हा रस्ता होईल त्यावेळी 100 पट किंमतीने तुमच्या जमिनी व्यापाऱ्यांना हे लोक विकणार आहेत. त्यामुळे कोणीही जमिनी विकू नका. आपल्याकडे कुंपनच शेत खात आहे. आपलेच लोक आपल्या लोकाकडून कमी किंमतीने जमिनी घेऊन जास्त किंमतीने व्यापाऱ्यांना विकत असल्याचे राज ठाकरे सांगितले.