

मुंबई (Mumbai): मुलुंड डम्पिंग ग्राउंड येथे गोल्फ कोर्ससाठी व्यवहार्यता अभ्यास (फिजिबिलिटी स्टडी) करण्यास मुंबई महानगरपालिकेने प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाला (PGTI) परवानगी दिली आहे. यामुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच जुन्या इमारती व निवासी वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, सांगितले जाते.
मुलुंड कचराभूमीतील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून भूखंड मोकळा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात मोकळ्या भूखंडावर गोल्फ कोर्स उभारण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. त्यानुसार महापालिकेने गोल्फ कोर्स उभारण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याची जबाबदारी पीजीटीआयवर सोपवली आहे.
गेल्याच आठवड्यात मुंबई महानगरपालिकेने मुलुंड डम्पिंग ग्राउंड येथे गोल्फ कोर्ससाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यास प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) ला परवानगी दिली. या निर्णयाचे स्वागत करताना आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले की, यामुळे परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच जुन्या इमारती व निवासी वसाहतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल.
जर हा गोल्फ कोर्स उभारला गेला, तर संपूर्ण मुलुंड परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असेही कोटेचा यांनी नमूद केले. दरम्यान, याच अनुषंगाने आमदार कोटेचा यांनी दिग्गज क्रिकेटपटू व प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष कपिल देव, तसेच संस्थेचे सीईओ कमलदीप सिंग यांची भेट घेतली.
गोल्फ आणि इतर ऑलिम्पिक खेळ तळागाळापर्यंत तरुण पिढीपर्यंत कसे पोहोचवता येतील, यावर आमची फलदायी चर्चा झाली. यासाठी संधी कशा निर्माण करता येतील आणि कोणती पावले उचलणे आवश्यक आहे, यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
मुंबई व विशेषतः मुलुंडमध्ये ऑलिम्पिक खेळ आणि गोल्फचा तळागाळात प्रसार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिक ऑलिम्पिक पदके जिंकण्याचे स्वप्न साकार करण्यावर आमचा भर होता, असे कोटेचा यांनी सांगितले.