

मुंबई (Mumbai): मुंबई बंदराने हरित होण्याकडे पहिले मोठे पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत मालवाहू जहाजांना बंदरापर्यंत आणण्यासाठी विद्युत बॅटरीआधारित बोटींचा आधार घेतला जाणार आहे. अशा ६० टन क्षमतेच्या दोन टग बोटी बंदर प्राधिकरणाने मागविल्या आहेत. त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या श्रेणीत विद्युत बॅटरीआधारित बोटींचे तंत्रज्ञान नवे आहे. अशा टगबोटींमुळे एका फेरीत किमान १५० टनांहून अधिक कार्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल. समुद्रात विविध मार्ग असतात. त्यांना ‘चॅनल्स’ संबोधले जाते. समुद्राच्या आत तळाशी विविध खडक असतात. त्यातून नेमका मार्ग काढत हे ‘चॅनल्स’ तयार केले जातात.
याच चॅनल्समधून मालवाहू जहाजांना बंदरापर्यंत आणण्यासाठी टग बोटींचा वापर होतो. सर्वत्र या टग बोटी डिझेलआधारित आहेत. यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. ते टाळण्यासाठी मुंबईसह देशभरातील पाच मोठ्या बंदरांना हरित बंदरात परावर्तित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ग्रीन टग ट्रान्झिशन प्रोग्रॅम’ ही मोहीम आखली आहे.
याअंतर्गत २०३० पर्यंत किमान दोन असे टग हे डिझेलऐवजी विद्युत बॅटरीआधारित असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता मुंबई बंदर प्राधिकरणाने असे टग सेवेसाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली असून भाडेतत्त्वावर असे टग मागविण्यात आले आहेत.
भारतातील बंदरांवर कार्यरत डिझेलच्या टगबोटी ८० ते १०० टन क्षमतेच्या आहेत. तर माझगाव डॉकला सेवा देणाऱ्या कंपनीने मागील वर्षी ३० टन क्षमतेची टगबोटी खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) अशा ६० टन क्षमतेच्या विद्युत बॅटरीआधारित टगबोटी खरेदी केल्या आहेत.
त्यापाठोपाठ आता मुंबई बंदर प्राधिकरणाने ही तयारी केली आहे. त्यानुसार मुंबई बंदर व जेएनपीए, हे दोन्ही आता ६० टन क्षमता श्रेणीत विद्युत टग बोटी असलेल्या श्रेणीत येणार आहेत.